
no images were found
गायीचे दूध प्रति लिटर 2 रुपयांनी महागले
राज्यभरात गायीच्या दूधाच्या किंमतीत प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्य दूध व्यावसायिक संघटनेने हा निर्णय घेतला आहे. आजपासून हा निर्णय लागू झाला आहे.त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्प सादर होत असलेल्या दिवशीच सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे.महाराष्ट्रातील प्रमुख 22 खासगी आणि सहकारी दूध संघांमध्ये काल सायंकाळी बैठक पार पडली. बैठकीत दूध खरेदी दर, पिशवी पॅकिंग आणि आणि दुधाच्या वाहतुकी खर्चाबाबत चर्चा झाली. या सर्वांचा खर्च वाढल्याने दुधाचे दर वाढवण्यात यावे, यावर संस्थांचे एकमत झाले. याशिवाय राज्यातील बाजारपेठेत परराज्यातील दूध संघांची विक्री वाढत आहे. त्यामुळे स्पर्धेत टिकण्यासाठी दुधाच्या किरकोळ विक्री दरात दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.राज्यातील खासगी आणि सहकारी दूध संघांची शिखर संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य दूध व्यावसायिक संघटनेने ही दरवाढ 1 फेब्रुवारी म्हणजेच आजपासून लागू केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. काही दूध संस्थांनी ग्राहकांवर बोजा पडू नये म्हणून मुख्य वितरक आणि किरकोळ विक्रेत्यांचे कमिशन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काही दूध संस्थांचे विक्री मूल्य स्थिर राहण्याची शक्यता आहे.सध्या देशभरात दुधाची टंचाई आहे. दुधापासून तयार होणाऱ्या पावडर, बटर आणि इतर पदार्थाच्या किंमती वाढल्या आहेत. पावडर आणि बटरचे दर वाढल्याने दूध खरेदी दरातही वाढ होत आहे. याचपार्श्वभूमीवर राज्यातील दूध संघांनी दूध दरात वाढ केली आहे.