no images were found
पुण्यात MPSC च्या विद्यार्थ्यांचं आंदोलन
पुणे : यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएससी (MPSC) परीक्षा घेण्याचा नवा पॅटर्न 2025 पासून लागू करण्याच्या मागणीसाठी पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. दरम्यान, भाजप (BJP) आमदार गोपीचंद पडळकर यांनी या आंदोलनादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बातचीत करत विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडले. आज कॅबिनेटच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचं आश्वासन फडणवीसांनी दिलंय. मात्र जोपर्यंत कॅबिनेटमध्ये निर्णय होत नाही तोपर्यंत विद्यार्थी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत.
पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. यूपीएससीच्या (UPSC) धर्तीवर नवीन अभ्यासक्रम यावर्षी लागू न करता तो 2025 पासून लागू करावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले आहे. अलका टॉकीज चौकात अराजकीय साष्टांग दंडवत आंदोलन करण्यात आले आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अलका टॉकीज चौकात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 13 जानेवारीला देखील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. आज एमपीएससीचे विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर आले आहेत. आंदोलनाच्या ठिकाणी भाजपचे अभिमन्यू पवार आणि गोपीचंद पडळकर हे देखील उपस्थित आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी नव्या वर्णनात्मक पद्धतीचा अभ्यासक्रम 2025 नंतर लागू करण्यासंदर्भात रोहित पवार यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे. पुण्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला आले असून त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करत आहेत.