
no images were found
निसर्गोपचाराचा प्रचार व प्रसार करणे काळाची गरज – डॉ. के सत्यलक्ष्मी
कोल्हापूर : निसर्गोपचार एकाच वेळी शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक अशा सर्व गोष्टींचा उपचार करतो, असे मत राष्ट्रीय प्राकृतीक चिकीत्सा संस्था, आयुष मंत्रालय, पुणे यांच्या संचालिका डॉ. के. सत्यलक्ष्मी यांनी राज्यस्तरीय योग व निसर्गोपचार परिषदेच्या उद्धाटन प्रसंगी व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहात आजीवन अध्ययन व विस्तार अधिविभागाच्यावतीने एकदिवशीय राज्यस्तरीय योग व निसर्गोपचार परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेमध्ये विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के हे अध्यक्षस्थानी होते. तर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
डॉ. के. सत्यलक्ष्मी पुढे बोलताना म्हणाल्या, निसर्गोपचारामध्ये गंभीर आजारांवर उपचार त्वरित केला जातो. हया उपचारामध्ये दडलेले रोग बाहेर काढून त्यावर उपचार करून कायमचे बरे केले जातात. निसर्गोपचार ही एक जीवनपध्दती असून येणाऱ्या काळात निसर्गोपचाराचे महत्त्व खूप वाढेल. त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्यांनी प्रामाणिकपणे निसर्गोपचाराचा प्रचार व प्रसार करावा.
निसर्गानुकूल जीवन जगण्याची पध्दती असलेल्या निसर्गोपचाराचा प्रचार व प्रसार व्हावा, या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर पाच सत्रात संपन्न झालेल्या या परिषदेत योग, निसर्गोपचार, ॲक्युप्रेशर, आहारशास्त्र या विषयावर व्याख्याने झाली. डॉ. के. सत्यलक्ष्मी (पुणे) यांच्यासह जीवनलालजी गांधी (यवतमाळ), डॉ. सुभाषचंद्र मालाणी (जत), प्रा. सदानंद वाली (गडहिंग्लज), आश्विनी राऊत (अमरावती), नारायण आंभोरे (अकोला), राम व्हराडे (मुंबई), या तज्ञांनी मार्गदर्शन केले.
दरम्यान, परिषदेत विविध प्रात्यक्षिके दाखवण्यात आली शिवाय योग, निसर्गोपचार, ॲक्युप्रेशर या विषयावर संशोधकांनी पेपर सादर केले. यावेळी अधिविभागाचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, सहा. प्राध्यापिका डॉ. सुमन बुवा, सहा. प्राध्यापक यशोधन बोकील, आर. एम. जाधव यांच्यासह योग व निसर्गोपचार अभ्यासक्रमाचे साधन व्यक्ती, विद्यार्थी व मुंबई, पुणे, अकोला, अमरावती, औरंगाबाद, कोकण, गोवा, येथून आलेले प्रशिक्षणार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.