
no images were found
पहिली आंतरभारती चषक बुद्धिबळ स्पर्धा संपन्न
आंतरभारती चषक बुद्धिबळ स्पर्धेत जयसिंगपूरच्या दिशा पाटीलने अजिंक्यपदक पटकाविले, जांभळीचा अभय भोसले उपविजेता तर कोल्हापूरची महिमा शिर्के तृतीय स्थानी
कोल्हापूर : अरिहंत सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्ट कोल्हापूरने पुरस्कृत केलेल्या व आंतरभारती शिक्षण संस्थेने आयोजित केलेल्या पहिली आंतरभारती चषक बुद्धिबळ स्पर्धा आज संपन्न झाल्या.कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम आठव्या फेरीमध्ये पहिल्या पटावर अटीतटीच्या लढतीत द्वितीय मानांकित जयप्रभा इंग्लिश स्कूल जयसिंगपूर च्या दिशा पाटील ने आघाडीवर असलेल्या चतुर्थ मानांकित ज्ञानगंगा प्राथमिक विद्यामंदिर जांभळीच्या अभय भोसलेचा पराभव करीत आठ पैकी साडेसात गुण मिळवून अजिंक्यपद पटकावले व पहिल्या आंतरभारती चषकावर आपले नाव कोरले. तिला रोख तीन हजार रुपये व चषक देऊन गौरविले. अभय भोसलेला सात गुणासह उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले त्याला रोख दोन हजार रुपये व चषक देऊन सन्मानित केले.दुसऱ्या पटावर नववी मानांकित सेव्हंथ डेज स्कूल कोल्हापूरच्या महिमा शिर्केने पाचवा मानांकित संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल च्या शौर्य बगाडिया वर विजय मिळवित सात गुणासह तृतीय स्थान पटकाविले तिला रोख पंधराशे रुपये व चषक प्रदान करण्यात आला.शौर्यला सहा गुणासह आठवे स्थान मिळाले. तिसऱ्या पटावर अग्रमानांकित जयप्रभा इंग्लिश मीडियम स्कूल जयसिंगपूरच्या दिव्या पाटील ने कोल्हापूर शांतिनिकेतन स्कूल च्या आरव पाटील चा पराभव करून चौथे स्थान मिळविले तिला रोख एक हजार रुपये चे बक्षीस देण्यात आले.चौथ्या पटावर आठवा मानांकित स. म. लोहिया हायस्कूलच्या शंतनू पाटील ने कोल्हापूरच्या सर्वेश पोतदार चा पराभव करीत साडेसहा गुणासह पाचवे स्थान पटकाविले.पाचव्या पटावर सेवंथ डे स्कूल कोल्हापूरच्या व्यंकटेश खाडे पाटील ने प्रज्वल वरुडकर चा पराभव करून सहावे स्थान मिळविले तर सहाव्या पटावर सांगलीच्या ईश्वरी जगदाळे ने इचलकरंजीच्या जयसिंगपूरच्या सिद्धी कर्वेचा पराभव करीत सातवे स्थान ग्रहण केले.शिरोली हायस्कूलच्या महंमदसाद बारस्कर ने कोल्हापूरच्या अंशुमन शेवडे वर विजय मिळवून नववे स्थान प्राप्त केले तर न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल च्या तेजस कुंदर्गीने इचलकरंजीच्या आराध्य ठाकूर देसाईचा वर मात करत दहावे स्थान पटकाविले.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ आंतरभारती शिक्षण संस्थेच्या वी स खांडेकर प्रशालेचा माजी़ विद्यार्थी व कोल्हापूर जिल्हातील एकमेव आंतरराष्ट्रीय मास्टर सम्मेद शेटे याच्या हस्ते व संस्थेच्या कार्याध्यक्षा पल्लवीताई कोरगावकर, उपाध्यक्ष जिनरत्न रोटे, स्पर्धा संयोजक भरत शास्त्री, आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले,मुख्याध्यापिका विद्या वाणी व नेहा कानकेकर,क्रीडा प्रमुख दगडू रायकर,समीर जमादार,राजेंद्र बनसोड,सदाशिव र्हाटवळ व मोरबाळे मॅडम यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
या स्पर्धेसाठी मुख्य पंच म्हणून मनीष मारुलकर यांनी काम पाहिले त्यांना आरती मोदी, रोहित पोळ व महेश व्यापारी यांचे सहकार्य लाभले.