no images were found
महाराष्ट्रात नवं राजकीय समीकरण! शिवशक्ती-भीमशक्ती आली एकत्र
मुंबई : शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी घोषणा केली. दुपारी या नेत्यांनी संयुक्तरित्या पत्रकार परिषदेत ही मोठी घोषणा केली. त्यामुळं राज्याच्या राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम्ही दोघं एकत्र येत आहोत. पुढं राजकीय वाटचाल कशी असेल, याविषयी विचारविनिमय करुन आम्ही पुढं जाऊ. शिवशक्ती आणि भिमशक्तीचा प्रयोग याआधी झाला होता. पण, प्रकाश आंबेडकर आणि मी पहिल्यांदाच या वास्तूमध्ये एकत्र आलो आहे, असं त्यांनी सांगितलं. प्रकाश आंबेडकर म्हणाले, वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांच्या युतीमुळं निवडणुकांमध्ये आता बदलाचं वातावरण सुरू होणार आहे. देशाची वाटचाल हुकुमशाहीकडं सुरु आहे. इथली लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं. शिवशक्ती-भीमशक्ती का एकत्र आली? यासंदर्भातील संयुक्त निवेदनही सादर करण्यात आलं आहे.
आपल्या देशाची राजकीय परिस्थिती दिवसेंदिवस अधोगतीकडं जाताना दिसत आहे. लोकशाही स्वातंत्र्याची गळचेपी करत देशाची वाटचाल हुकूमशाहीकडं सुरू आहे. हुकूमशाहीकडं सुरू झालेली वाटचाल थांबवण्यासाठी राजकीय पाऊल उचलण्याची आवश्यकता प्रकर्षानं जाणवत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेतील शेवटच्या भाषणात दि. 25 नोव्हेंबर 1949 रोजी देशाला उद्देशून इशारा दिला होता की, देशामध्ये सामान्यांचे प्रश्न सोडून इतर विषयांत महत्त्व दिलं तर देशाच्या स्वातंत्र्याला पुन्हा धोका निर्माण होऊ शकतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही नेहमीच देश आणि लोकहिताला प्राधान्य दिलं.
लोकशाहीस प्राधान्य दिलं नाही तर देशात अराजक निर्माण होईल ही त्यांची भूमिका डॉ. आंबेडकरांच्या परखड विचारांशीच मिळणारी आहे. महात्मा फुले, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्म ही आवश्यक बाब असल्याचं नमूद केलं आहे. परंतु, या तिघांनीही राष्ट्राला प्राधान्य दिलेलं आहे. लोकशाही टिकली तरच देश टिकतो, असं मत प्रबोधनकार ठाकरे यांनीसुद्धा मांडलं आहे. म्हणून आम्ही एकत्र येऊन देशाचे स्थैर्य, नीतिमत्ता व राष्ट्रीय हिताचं राजकारण करण्यास कटिबद्ध आहोत.