Home क्राईम राधानगरी व भुदरगड तालुक्यातील चार बोगस डॉक्टरांवर कारवाई

राधानगरी व भुदरगड तालुक्यातील चार बोगस डॉक्टरांवर कारवाई

21 second read
0
0
203

no images were found

राधानगरी व भुदरगड तालुक्यातील चार बोगस डॉक्टरांवर कारवाई

कोल्हापूर :  पीसीएनडीटी व बोगस डॉक्टर कायद्यांतंर्गत राधानगरी व भुदरगड तालुक्यातील 4 बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक हुबेकर यांनी दिली. भुदरगड तालुक्यात डॉ. विजय कोळस्कर हा इतर दोन साथीदारांच्या मदतीने गर्भलिंग निदान व बेकायदेशीर गर्भपात करतात या बाबत तक्रार प्राप्त झाली होती. तसेच पोलीस विभागास ही गोपनिय बातमीदाराव्दारे जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर गर्भपात व गर्भलिंग निदान करणारी टोळी सक्रीय असल्याची बातमी प्राप्त झाली होती. त्यानुसार संबंधित टोळीतील संशयितांवर स्टिंग ऑपरेशनव्दारे कारवाई करण्याबाबत नियोजन करण्यात आले. त्यानुसार पोलीस विभाग तसेच आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या दोन टिम  (टिम A व B) तयार करण्यात आल्या. त्यानुसार टिम A राधानगरी येथील संशयीतांवर लक्ष ठेवून होती व टिम B भुदरगड येथील टोळीवर लक्ष ठेवून होती. टिम A सोबत डिकॉय केस म्हणून पोलीस विभागातील रेश्मा शेटके, महिला पोलीस कॉन्स्टेबल व टिम B सोबत जयश्री विभुते, सहा. फौजदार कार्यरत होत्या.

दिनांक १७ जानेवारी २०२३ रोजी सकाळी प्रथम राधानगरी तालुक्यातील संशयीत एजंट सुनिल ढेरे, रा. आमजाई व्हरवडे, ता. राधानगरी याने गरोदर महिलेला घेवून गाव परीते, ता. करवीर येथे बोलवले. त्यानुसार टिम मधील डिकॉय महिला श्रीम. शेटके या त्यांच्या डमी नातेवाईकासोबत संबंधित ठिकाणी गेल्या. थोड्याच वेळात एजंट सुनिल ढेरे तेथे आला. डिकॉय महिलेस दुचाकीवर घेतले व नातेवाईकास तेथेच सांगून कसबा वाळवे, ता. राधानगरीच्या दिशेने रवाना झाला. त्यावेळेला टिम A मधील इतर सदस्य त्यांचा पाठलाग करत थोड्या अंतरावरुन जात होते. कसबा वाळवे येथील नियोजित ठिकाणी पोहचण्यापूर्वीच सुनिल ढेरे यास संशय आल्यामुळे त्याने डिकॉय महिलेस रस्त्यावरच उतरवले व पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच टिम A कडून त्याला ताब्यात घेण्यात आले.

सुनिल ढेरे यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्याचे साथीदार श्रीमंत पाटील रा. कसबा वाळवे, ता. राधानगरी व दत्ता पाटील रा. कसबा वाळवे, ता. राधानगरी यांच्याकडे विना नोंदणी पोर्टेबल सोनोग्राफी मशिन असून तेच गर्भलिंग निदान करतात व बेकायदेशीर गर्भपात करतात त्या करीता मी त्यांना पेशंट (गिऱ्हाईक)देण्याचे काम करतो. त्या बदलात मला कमिशन मिळते, असे त्याने सांगितले. श्रीमंत पाटील व दत्ता पाटील यांच्या मोबाईलव्दारे त्यांचे लोकेशन निष्पन्न करुन त्याचा पाठलाग केला असता हे दोघेजण त्याच्याकडे असणारे पोर्टेबल सोनोग्राफी मशिन घेवून पळून जात असताना त्यांना शेळेवाडी ता. करवीर जि. कोल्हापूर गावच्या नजीक पाठलाग करुन ताब्यात घेण्यात आले.

दिनांक १७ जानेवारी २०२३ रोजीच टिम B भुदरगड तालुक्यातील मडीलगे या गावी राहणारा डॉ. विजय कोळस्कर यांच्या संपर्कात होती. विजय यांनी डीकॉय महिलेस घेवून अदमापुर ता. भुदरगड येथील बाळूमामा मंदिरा जवळ येण्यास सांगितले होते. त्यानुसार टिम B मधील डिकॉय महिला श्रीम. जयश्री विभुते, सहा. फौजदार या त्यांच्या डमी नातेवाईकासोबत बाळूमामा मंदिरा जवळ थांबल्या होत्या व टिम B मधील इतर सदस्य त्यांच्यावर नजर ठेवून उभे होते. साधारणतः दुपारच्यावेळी विजय कोळस्कर याचा कोणताच निरोप न आल्यामुळे त्याच्याशी पुन्हा दूरध्वनीव्दारे संपर्क केला असता त्याने प्रथम निपाणी, ता. निपाणी, जि. बेळगाव, कर्नाटक राज्य येथे येण्याचा आग्रह केला. परंतु डिकॉय महिलेने तब्येतीचे खोटे कारण सांगून जवळपासच सोय करण्यास सांगितले.

विजय कोळस्कर याने डिकॉय महिलेस एकाच नातेवाईकासोबत कोल्हापूर- गारगोटी मार्गावरील मडीलगे गावच्या फाट्यावर येण्यास सांगितले. त्यानुसार डिकॉय महिला व तिची डमी नातेवाईक नियोजित ठिकाणी जावून थांबल्या. त्यांच्यावर नजर ठेवण्याकरिता टिम B चे इतर सदस्य त्याच्याच आजूबाजूला काही अंतरावर थांबले. थोड्याच वेळात एक पांढऱ्या रंगाची स्विप्ट MH ०९ BB ०९३६ ही गाडी डिकॉय महिलेच्या समोर येवून थांबली. त्यामुधन विजय कोळस्कर उतरला व डिकॉय महिलेकडे प्राथमिक चौकशी करु लागला व त्या दोघींना स्वीप्ट मध्ये बसवून मडिलगे गावच्या दिशेने रवाना झाला. त्याच्या गाडीचा पाठलाग करत टिम B मधील इतर सदस्य वेगवेगळ्या दुचाकी वरुन रवाना झाले.

साधारणतः काही किलोमीटर गेल्या नंतर विजयने मडीलगे गावातील एका घरासमोर गाडी थांबवली व गाडीमध्ये असणाऱ्या दोन महिलांना उतरण्यास सांगून ते तिघेही गाड़ी समोर असलेल्या घरात गेले.  विजय याने घराचे दार बंद करुन घेतले. टिम मधील इतर सदस्यांनी बाहेरच्या बाजुने घरास वेढा घातला व साधारणतः दहा ते बारा मिनिटाने त्या घराचे दार वाजवले. विजय यानेच घराचा दरवाजा उघडला त्यावेळी टिम मधील सदस्यांनी त्यांची ओळख करुन देत छापा पडल्याचे विजयला सांगितले. विजयला छापा पडल्याचे सांगितले त्यावेळी विजय याने नुकतीच आपल्या डिकॉय महिलेची सोनोग्राफी करुन तिला मुलगा असल्याचे सांगितले होते. विजयच्या घरातच MINDRAY या कंपनीचे चालू स्थितीतील पोर्टेबल सोनोग्राफी मशिन आढळून आले. आपल्या डिकॉय महिलेने याच सोनोग्राफी मशिनव्दारे विजय याने सोनोग्राफी करुन तिला मुलगा असल्याचे सांगितले व त्या करीता १४ हजार रुपये घेतल्याचे सर्वासमोर सांगितले.

 विजयच्या घराची झडती घेतली असता सोनोग्राफी करीता लागणारे Novetras ECG/USG जेल, सोनोग्राफी करत असताना बॅटरीबॅकप (इन्व्हर्टर) आढळून आले. तसेच विजयकडे कसून चौकशी केली असता त्याने गर्भपातासाठी लागणाऱ्या Misoprostol व Mifepriston या गोळ्या त्याच्या गाडीत (स्विप्ट MH B ०९३६ ठेवल्याचे सांगितले. त्याअनुषंगाने गाडीमध्ये शोध घेतला असता या गोळ्या आढळून आल्या. वरील दोन्ही प्रकरणात आढळून आलेले विना नोंदणी सोनोग्राफी मशिन, गर्भपातासाठी वापरली जाणारी औषधे पंचांसमक्ष सील करण्यात आली आहेत. तसेच दोन्ही कारवाईतील संशयीतांवर बोगस डॉक्टर म्हणून गर्भपात कायद्यानुसार संबधित पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

संबंधित संशयीतांवर पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत सर्व संबंधितांचे जाबजबाब पूर्ण करुन गुन्हा नोंद करण्याची कारवाई सुरु असुन ती पूर्ण होताच पीसीपीएनडीटी कायदेअंतर्गत ही कोर्टकेस दाखल करण्यात येणार आहे. या कारवाईमध्ये पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक हुबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस विभागामधील सहाय्यक फौजदार श्रध्दा आमले, सहाय्यक फौजदार जयश्री विभुते, गुन्हे विभागाचे पोलीस उपनिरिक्षक शेषराज मोरे, सहाय्यक फौजदार रवी गायकवाड, पोलीस हवलदार आनंदराव पाटील, महिला पोलीस अमलदार तृप्ती सरोदे, महिला पोलीस कॉन्स्टेबल रेश्मा शेटके, हेड कॉन्स्टेबल किशोर सुर्यवंशी, सहाय्यक फौजदार राजु घारगे व महिला पोलीस कॉन्स्टेबल मिनाक्षी पाटील, तसेच आरोग्य विभागातील ग्रामीण रुग्णालय गारगोटी येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ. मिलींद कदम, ग्रामीण रुग्णालय राधानगरी येथील डॉ. वैद्यकिय अधिक्षक जी. बी. गवळी,  राधानगरी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांबळे,  भुदरगड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद वर्धन, राधानगरी,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शेट्ये, पीसीपीएनडीटी कायदा सल्लागार अॅड. गौरी पाटील,  लेखापाल, दिलीपसिंह जाधव व कनिष्ठ लिपीक महेश भाट  यांनी कामकाज पाहिले, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. हुबेकर यांनी दिली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…