no images were found
सांगलीमध्ये ख्रिस्ती समाजाकडून विविध मागण्यासाठी शांती महामूक मोर्चा
सांगली : महाराष्ट्रामध्ये ख्रिस्ती बांधव स्वतःला असुरक्षित मानत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. मोर्चाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. ख्रिस्ती समाजावर, चर्चवर, पाळक लोकांवर हल्ले, अन्याय व अत्याचार तात्काळ थांबवण्यात यावे. यासाठी कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. येथील ख्रिस्ती समाजाकडून शांती महामूक मोर्चा काढण्यात आला.
ज्या धर्मगुरुंवर आणि समाजातील लोकांवर धर्मांतराच्या नावावर खोट्या केसेस दाखल केल्या आहेत, त्या तात्काळ मागे घेण्यात याव्यात, ज्या चर्चवर हल्ला करुन नासधूस झाली आहे, त्यांना सरकारने तात्काळ नुकसान भरपाई देऊन, गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. बेकायदेशीररित्या चर्चमध्ये प्रवेश करुन प्रार्थना थांबवायचे अधिकार समाजकंटकांना कोणी दिले? याची चौकशी व्हावी आणि सर्व ख्रिस्ती धर्मगुरुंना संरक्षण मिळावे, असेही म्हटले आहे. ख्रिस्ती प्रार्थनेस जादूटोण्याचे स्वरुप देऊन ख्रिस्ती धर्मगुरुंवर खोटे आरोप करतात. आतापर्यंत सर्वजण सलोख्याने राहत असताना काही जातीय आणि धर्मांध लोकांनी त्याला काळीमा फासण्याचे काम केल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
काही लोक जाणीवपूर्वक ख्रिस्ती धर्म हा इंग्रजांपासून आला आहे अशी खोटी व चुकीची अफवा पसरवत आहेत आणि ही गोष्ट अतिशय निंदनीय असल्याचे समाजाने म्हटले आहे. ख्रिस्ती समाजाला जाणूनबुजून बदनाम केले जात आहे म्हणून हे सर्व चुकीचे प्रकार कुठे तरी थांबले जावे, असेही त्यांनी म्हटले आहे. आमच्या मागण्या तात्काळ कारवाई करावी, असे समाजाने म्हटले आहे.