no images were found
खासदार धैर्यशील माने यांना बेळगाव जिल्ह्यात प्रवेशबंदी
इचलकरंजी : शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांना बेळगांव जिल्ह्यात प्रवेशबंदी जाहीर करण्यात आली आहे. या संदर्भात बेळगावचे जिल्हाधिकारी यांनी आदेश जारी केला असून बेळगांव शहरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
शिवसेना व महाराष्ट्र एकिकरण समितीच्या वतीने बेळगांव येथे हुतात्मा दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने महाराष्ट्रातून लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्तेे सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने हेसुध्दा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. हुतात्मा दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेऊन खासदार माने यांचेकडून प्रक्षोभक भाषण झाले. त्याचबरोबर सीमावादाशी संबंधित कोणतेही वक्तव्य केले गेले तर बेळगाव शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खा. धैर्यशील माने यांना जिल्हाधिकार्यांनी आदेश जारी करत संपूर्ण बेळगाव जिल्ह्यात प्रवेशबंदी लागू केली आहे.
कर्नाटक राज्याच्या सीमेला लागून असलेल्या बेळगाव शहरासह सुमारे ८६५ गावे आणि ५ शहरे महाराष्ट्र राज्याला जोडण्याबाबत महाराष्ट्र राज्य सरकारने केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयात प्रतिवादी केले आहे. सदर याचिका सध्या न्यायप्रविष्ठ आहे. महाराष्ट्र राज्य विरुद्ध बेळगावी शहरात यापूर्वी विविध कन्नड समर्थक संघटनांनी महामार्ग रोखून निषेध व्यक्त केला होता. विविध कन्नड समर्थक संघटनांच्या सदस्यांनी बेळगाव शहरातील महाराष्ट्र राज्यातील मंत्र्यांना बेळगाव शहरात प्रवेश देऊ नये यासह अनेक मागण्या यापूर्वीच केल्या आहेत.
६ डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्याचे मंत्री व खासदार बेळगाव शहरात येण्याच्या पार्श्वभूमीवर विविध कन्नड समर्थक संघटनांनी पुनश्च निदर्शने केली होती. या सर्व पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील माने यांच्या बेळगावातील प्रवेशाने कायदा व सुव्यवस्था बिघडण्यची शक्यता असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या हितासाठी आणि जनतेच्या मालमत्तेचे व जीविताचे रक्षण करण्याच्या हेतूने ही प्रवेशबंदी करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे