no images were found
वाढपी ते मराठी चित्रपट निर्मातापर्यंतचा प्रीतम पाटील यांचा थक्क करणारा प्रवास
कोल्हापूर : प्रीतम पाटील दिग्दर्शित “ढिशक्याव” हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या सिनेमातून हवेली तालुक्यातील वारजे माळवाडी येथील एक नवा चेहरा राजीव पाटील निर्माता आणि अभिनेता म्हणून या सिनेमातून मराठी फिल्म इंडस्ट्रीत पहिले पाऊल टाकणार आहे.
घरातील परिस्थिती जेमतेम असल्यामुळे लग्नात जेवण वाढण्यापासून जीवनाची केलेली सुरवात आज मराठी चित्रपटाचा निर्मातापर्यंत घेऊन आली. त्यात अभिनयाची आवड असल्यामुळे मराठी चित्रपट क्षेत्रातील संदीप पाठक, प्रथमेश परब, सुरेश विश्वकर्मा, महेश घाग, सिद्धेश्वर झाडबुके, अहेमद देशमुख अशा अनेक दिग्गजंबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्याचे चीज झाल्यामुळे चेहऱ्यावर दिसणारे समाधान लपवणे अशक्य आहे. माझे एकट्याचे यश नसून माझ्या आयुष्यात ज्या ज्या लोकांनी मला कामाची संधी दिली त्या सगळ्यांची आहे, असे मत यावेळी राजीव पाटील यांनी व्यक्त केले.
स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कष्टांचा सामना करावा लागला. सुरक्षारक्षक म्हणून काम केले, पेरू विकले, शर्ट विकले, पेपर टाकले अशी अनेक कामे केली. फळे विकण्यासाठी वर्गमित्र वैभव शीतल याने दिलेली सायकल, रामदास मोरे यांनी शर्ट विकायला मोफत दिलेली त्यांच्या दुकानासमोरची जागा असेल, दत्ता झंजे आणि कैलास कुऱ्हाडे याची मैत्री आणि साथ असेल, स्व. आमदार रमेश वांजळे यांच्या पत्नी हर्षदाताई वांजळे आणि मुलगी नगरसेविका सायली वांजळे-शिंदे यांनी केलेले मार्गदर्शन असेल, उद्योजक शरदआबा बराटे यांनी दिलेली संधी असेल आणि बऱ्याच लोकांनी दिलेलं प्रेम या सर्वाचा वाटा खूप मोठा आहे
आता मिळालेल्या यशामुळे त्या कष्टाचे सार्थक झाले. ढिशक्याव चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल याची खात्री असून यापुढेही प्रेक्षकांची अशीच साथ मिळेल अशी आशा आहे, असे मत यावेळी राजीव पाटील यांनी मांडले.