no images were found
किरीट सोमय्यांनी अंबाबाईच्या दर्शनाला यावे : हसन मुश्रीफ
कोल्हापूर : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कोल्हापुरात यावं. अंबाबाईचे दर्शन घ्यावं आणि आम्ही केलेल्या कामांचादेखील आढावा घ्यावा. आमचा एकही कार्यकर्ता किरीट सोमय्या यांना अडवणार नाही, हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत त्यांना निमंत्रण दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी ग्रामविकास मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांचे निवासस्थान, त्यांचे निकटवर्तीय माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांचे निवासस्थान, सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना या ठिकाणी बुधवारी सक्तवसुली संचलनालयाने (ED) छापेमारी केली. या तीन ठिकाणांसह मुश्रीफ यांच्या कन्येच्या कोल्हापुरातील सासने मैदान परिसरातील घरावरही छापा टाकण्यात आला.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी पुण्यातही मुश्रीफ यांच्याशी संबंधित चार ठिकाणी छापे टाकले. शिवाजीनगर येथील ई-स्क्वेअर समोर पेट्रोल पंपाच्या मागे इमारतीमधील कार्यालय, हडपसर आणि कोंढवा भागातील अशोका म्जुज सोसायटीत मुश्रीफ यांचे नातेवाईक, तसेच साऊथ मेन रोड-कोरेगाव पार्कमध्ये राहणारे व्यावसायिक भागीदार यांच्यावर छाप्याची कारवाई केली. या कारवाईनंतर राज्यात एकच खळबळ उडाली.
या कारवाईनंतर हसन मुश्रीफ आज प्रथमच कोल्हापुरात पोहोचले. यावेळी त्यांनी ईडीच्या कारवाईवरून तसेच किरीट सोमय्या यांनी पुन्हा कोल्हापुरात येणार असल्याच्या केलेल्या वक्तव्यावर भाष्य केलं. हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, किरीट सोमय्यांनी अंबाबाईच्या दर्शनाला यावे ते पुढे म्हणाले, अधिकाऱ्यांवर दबाव असतो त्यामुळे या छाप्यादरम्यान त्यांची कोणतीही चूक नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांना आम्ही शांततेचं आवाहन केलं. आलेल्या अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं. गेल्या पाच वर्षांपासून किरीट सोमय्या अशाच पद्धतीचे आरोप करत आहेत. मात्र, त्यामधून काहीही निष्पन्न झालेलं नाही. दरम्यान, सकाळी आठ वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत प्रेम करणाऱ्या जनतेचे देखील आभार हसन मुश्रीफ यांनी मानले.