no images were found
निवडणुक आचार संहिता सुरू असल्याने मोदी-शहांचे पोस्टर्स हटवले, अमरावतीत कृषी प्रदर्शन केले बंद
अमरावती : अमरावती पदवीधर संघाच्या निवडणुकीची आचार संहिता सुरू असल्याचने आमदार रवी राणा यांनी येथे आयोजित केलेले कृषी प्रदर्शन बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कार्यक्रम स्थळी बॅनरवर राजकीय नेत्यांचे फोटो असल्याने आचार संहितेचा भंग होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
कृषी प्रदर्शन बंद करा नाही तर पोलीस बंदोबस्तात कारवाई करू, असे अमरावती जिल्हा परिषदेचे सीईओ यांनी आदेश दिले आहेत. तर कृषी प्रदर्शन बंद होणार नाही सुरूच राहणार, अशी भूमिका रवी राणा यांनी घेतली आहे. कृषी प्रदर्शनावर स्थळी राजकीय नेत्याचे बॅनरवर फोटो असल्याने काही वेळापूर्वी प्रशासनाने बॅनर काढले होते. आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या कृषी महोत्सवातील मोदी, शहा, राणांचे पोस्टर, बॅनर प्रशासनाने हटवले होते. आचारसंहितेचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली.
आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने अमरावती शहरातील सायन्सकोर मैदानामध्ये युवा स्वाभिमान पक्षाचा वर्धापन दिनानिमित्त कृषी प्रदर्शनी व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्याठिकाणी अनेक बॅनर पोस्टर लागले होते, त्या पोस्टरवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोस्टर लागले होते.
मात्र, अमरावती विभागात पदवीधर निवडणूक होत असताना आचारसंहिता सुरू असून आपण राजकीय फोटो का लावले असा ठपका प्रशासनाने ठेवला. त्यानंतर त्या संपूर्ण कार्यक्रमातील प्रशासनाने पोस्टर काढले. मात्र, हे षडयंत्र काँग्रेसचे असून काँग्रेसने तक्रार केली. त्यानुसार प्रशासनाने पोस्टर काढल्याचा आरोप युवा स्वाभिमान पक्षाने केला आहे.