no images were found
राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीचा छापा, १०० कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्या यांच्या कागल येथील निवासस्थानी बुधवारी सकाळी ईडीकडून छापा टाकण्यात आला. या कारवाईमध्ये ईडीचे अधिकारी तसेच प्राप्तीकर विभागाचे अधिकारीही असल्याचे समजते. आज सकाळी सहा वाजता ईडीचे सुमारे २० अधिकारी हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी पोहोचले. या अधिकाऱ्यांकडून हसन मुश्रीफ यांच्या घरातील कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. गडहिंग्लज येथील आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यातील १०० कोटीच्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले होते. नेमके याचप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात बऱ्याच वर्षांपासून हसन मुश्रीफ हे नाव ख्यातनाम आहे. शरद पवार यांच्या अगदी जवळील एक नेते म्हणून त्यांची ओळख आहे. परंतु आज झालेल्या कारवाई दरम्यान जर हसन मुश्रीफ यांना अटक झालीच तर हा राष्ट्रवादी काँग्रेसला हा जबर धक्का असेल यात शंका नाही. हसन मुश्रीफ यांचे कागल येथील निवासस्थान, त्यांचे कार्यालय या सर्वाची ईडीकडून तपासणी सुरु असून हडपसर येथील अॅमनोरा आणि कोंढव्यात इडीची कारवाई चालू आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात किरीट सोमय्या यांचेकडून हसन मुश्रीफ यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले होते. याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेमध्ये हसन मुश्रीफ यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप करताना हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मिळून १५८ कोटी रुपयांचा घोटाळा झाला; यामध्ये हसन मुश्रीफ यांचा जावई आणि मुलगा सहभागी असल्याचे सोमय्या यांनी म्हटले होते.