no images were found
लाच देताना युवकाने व्हिडीओ शूट करून एसपींना दिल्याने आटपाडी पोलीस ठाण्यातील पीएसआय निलंबित
सांगली : आटपाडी पोलीस ठाण्यातील एका पोलिस उपनिरीक्षकाला एका युवकाला गुन्ह्यात मदत करतो असे सांगत त्याच्याकडून स्वीकारलेली लाच चांगलीच भोवली. संबंधित युवकाने पोलीस ठाण्यातच लाच घेतानाचा व्हिडीओ शूट केला आणि त्या व्हिडीओच्या आधारे पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. रामचंद्र गोसावी असे कारवाई झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.
आटपाडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र गोसावी यांनी काही महिन्यांपूर्वी करगणी गावचा सागर जगदाळे या तरुणाविरुद्ध आटपाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांत मदत करतो, असे सांगत लाच स्वीकारली. युवकावर दाखल असलेला गुन्हाचा तपास पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र गोसावी यांच्याकडे होता. मदत करतो म्हणून रामचंद्र गोसावी यांनी पैसे घेतले होते. मात्र, लाच घेतल्याचा व्हिडीओ त्या युवकाने शूट केला होता. हा गुन्हा खोटा असून खोटी फिर्याद देणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी या तरुणाने पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार देत केली होती.
दरम्यान, पोलिस अधीक्षक यांनी संबंधित तक्रारीबाबत आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, अनेकवेळा दाखल असलेल्या खोट्या गुन्ह्यांबाबत कोणतीच कारवाई होत नसल्याने व गुन्ह्याबाबत पोलिस योग्य तपास करत नसल्याचा आरोप जगदाळे याने पोलिस प्रमुखांकडे केला होता. याबाबत सागर जगदाळे या तरुणाने पोलीस अधीक्षक यांना १३ डिसेंबर रोजी अर्ज देत पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र गोसावी यांनी माझ्यावर दाखल असलेल्या खोट्या गुन्हात मदत करतो, म्हणून लाच मागत ती पोलीस ठाण्यामध्येच स्वीकारलेची तक्रार देत व्हिडीओ सादर केला होता. पोलीस उपनिरीक्षक गोसावी यांच्यावर झालेल्या निलंबनाच्या कारवाईने आटपाडी तालुक्यामध्ये खळबळ माजली आहे.