no images were found
विमानात महिलेच्या अंगावर लघुशंका करणारा शंकर मिश्रा अखेर अटकेत
नवी दिल्ली : न्यूयॉर्कहून दिल्लीला येत असलेल्या एअर इंडियाच्या विमानात एक धक्कादायक घटना घडली होती. या विमानाच्या बिझनेस क्लासमध्ये नशेत असलेल्या पुरुष प्रवाशाने एका महिला प्रवाशाच्या अंगावर लघुशंका केली होती. २६ नोव्हेंबर २०२२ रोजी एअर इंडियाच्या फ्लाइट AI-102 मध्ये ही घटना घडली होती. आता महिला प्रवाशाच्या अंगावर लघवी करणाऱ्या पुरुष प्रवाशाला अखेर अटक करण्यात आली आहे. शंकर मिश्रा असं आरोपीचं नाव आहे.
शंकर मिश्राला बंगळुरूमधून अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी ही अटक केली आहे. आरोपी मुंबईचा रहिवासी असून एअर इंडियाने मिश्राविरोधात केलेल्या तक्रारीनंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही घटना २६ नोव्हेंबर २०२२ ची आहे, पण एअर इंडियाने २८ डिसेंबर २०२२ रोजी पोलिसांना याची माहिती दिली होती. यानंतर पोलीस आरोपीचा शोध घेत होते.
याआधी शुक्रवारी महिलेचे काही मेसेज शेअर करत शंकर मिश्रा यांच्या वकिलांनी दावा केला होता की पीडितेने कथित कृत्य माफ केलं होतं आणि तक्रार नोंदवण्याचा तिचा कोणताही हेतू नव्हता. मिश्रा यांच्या वकिलाने दावा केला की मिश्राने पीडितेला नुकसानभरपाई म्हणून १५ ००० रुपये दिले होते, जे नंतर पीडितेच्या कुटुंबाने परत केले. त्याचवेळी, शंकर मिश्रा यांच्या वडिलांनी शुक्रवारी दावा केला की त्यांच्या मुलावरील आरोप ‘पूर्णपणे खोटे’ आहेत.
मुंबईचा रहिवासी असलेला आरोपी शंकर मिश्रा हा वेल्स फार्गो कंपनीचा उपाध्यक्ष आहे. ही कंपनी अमेरिकेच्या मल्टिनॅशनल फायनान्स सर्व्हिसेस कॉर्पोरेशनशी संबंधित आहे. एअर इंडियानं मिश्रा याच्यावर कारवाई करून त्याला एअर इंडियाच्या विमानातून ३० दिवसांची प्रवास बंदी घातली आहे. तसंच एअर इंडियानं दिल्लीतल्या पालम पोलीस ठाण्यात शंकर मिश्रा याच्याविरुद्ध तक्रार दाखल केलीय.