no images were found
सांगली जिल्हा बँकेची चौकशी होणार
सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. विधानसभेतील निलंबनानंतर माजी मंत्री जयंत पाटील यांना हा दुसरा धक्का मानला जात आहे. कारण त्यांचे या बँकेवर वर्चस्व आहे. दरम्यान, विरोधात असताना केलेली चौकशीची मागणी विद्यमान अध्यक्ष मानसिंग नाईक यांच्या अंगलट आली आहे.
सांगली जिल्हा बँकेवर अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सत्ता आहे. त्यांचे निकटवर्तीय दिलीप पाटील हे मागील पाच वर्षे अध्यक्ष होते. हे पद न मिळाल्याने नाराज झालेल्या मानसिंग नाईक यांनी बँकेतील गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी महाविकास आघाडी सरकारच्या काळात केली होती. त्यानुसार चौकशीचे आदेश निघाले, पण त्याला तेव्हा तत्कालीन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दोन वेळा स्थगिती दिली.
गतवर्षी झालेल्या निवडणुकीत पुन्हा जयंत पाटील यांची बँकेवर सत्ता आली. मानसिंग नाईक अध्यक्ष झाले. आता त्यांनीच पूर्वी केलेल्या मागणीचा पाठपुरावा करताना आ. गोपीचंद पडळकर यांनी चौकशी पुन्हा मागणी केली. त्यानुसार सहकार मंत्री अतुल सावे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. नोकर भरती, संगणक खरेदी, वाढलेला एनपीए अशा विषयाबाबत तक्रारी आहेत. त्याची चौकशी करण्याचे आदेश मिळाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.