no images were found
क्षयरुग्णांना पोषण आहार पुरवण्यासाठी दानशूर व्यक्ती, संस्थांनी मदतीसाठी पुढे यावे -प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे
कोल्हापूर : समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था, कंपन्या, औदयोगिक आस्थापना, प्रशासकीय संस्थांनी पुढाकार घेवून निक्षय मित्र बनुन संमती दिलेल्या क्षयरुग्णांना दरमहा पोषण आहार किट देण्यासाठी किमान सहा महिने मदत करावी, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहूजी सभागृहात जिल्हा टी.बी. फोरम को-मॉर्बिडीटी समितीची बैठक प्रभारी जिल्हाधिकारी श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. क्षयरोगाचे जिल्ह्यातून समूळ उच्चाटन होणे आवश्यक आहे, असे सांगून प्रभारी जिल्हाधिकारी श्री. शिंदे म्हणाले, क्षयरुग्णांना शासनाच्या वतीने चांगल्या प्रकारे वैद्यकीय सेवा पुरविल्या जात आहेत. या सेवा रुग्णांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचविण्यासाठी खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांचेही सहकार्य आवश्यक आहे. बैठकीतील पदाधिकारी व व्यक्तींनी निक्षय मित्र बनून रुग्ण दत्तक घ्यावेत, असे आवाहन श्री शिंदे यांनी केल्यावर सर्व समिती सदस्यांनी यास संमती दर्शवली. क्षयरोग होवू नये, यासाठीची औषधे पात्र रुग्णांना द्यावीत, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.उषा कुंभार यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे कार्यक्रमाची माहिती देवून कार्यक्रम प्रभावीपणे राबवताना येणाऱ्या अडचणींची माहिती दिली. जिल्ह्यात 23 जानेवारी 2023 पर्यंत सुळकुड, कुरुंदवाड, शहापूर, अमेनी, बोलावी, आकुर्डे, शिपूर, वैतागवाडी, महाडिक वसाहत व ट्रेझरी ऑफिस अशा 10 ठिकाणी क्षयरोग सर्वेक्षण सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. हूबेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.योगेश साळे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.उषा कुंभार, सीपीआरच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक, डॉ. अनिता सैबन्नावार, डॉ.गीता पिल्लई, डॉ. प्रकाश पावरा, दीपा शिपुरकर तसेच समिती सदस्य उपस्थित होते.
गोल्ड सबनॅशनल सर्टिफिकेट -22 साठी जिल्ह्याला नामांकन-क्षयरोग कामकाज पडताळणीसाठी कोल्हापूर जिल्ह्याला गोल्ड सबनॅशनल सर्टिफिकेट -22 साठी नामांकन मिळाल्याबद्दल प्रभारी जिल्हाधिकारी श्री. शिंदे यांनी उषा कुंभार, समिती सदस्य व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.