no images were found
MPL 48 वी राष्ट्रीय महिला अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा
मुंबईची आश्ना मखिजा आघाडीवर तर पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डची मेरी आना गोम्स द्वितीय स्थानावर
अतिग्रे-रुकडी : संजय घोडावत युनिव्हर्सिटी, अतिग्रे-रूकडी ता. हातकणंगले येथे चालू असलेल्या 48 वी राष्ट्रीय महिला अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या फेरीनंतर मुंबईची आंतरराष्ट्रीय महिला मास्टर अश्ना मखिजा पाच गुणासह आघाडीवर आहेत.पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डाची आंतरराष्ट्रीय महिला ग्रँड मास्टर मेरी आना गोम्स साडेचार गुणासह द्वितीय स्थानावर आहे.अग्रमांनाकित महिला ग्रँडमास्टर दिल्लीची वंतीका अगरवाल द्वितीय मानांकित गतविजेती नागपूरची महिला ग्रँडमास्टर दिव्या देशमुख, तृतीय मानांकित पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डची आंतरराष्ट्रीय मास्टर सौम्या स्वामीनाथन, पाचवी मानांकित अर्जुन पुरस्कार विजेती गोव्याची आंतरराष्ट्रीय मास्टर भक्ती कुलकर्णी, तमिळनाडूची आंतरराष्ट्रीय महिला ग्रँडमास्टर श्रीजा शेषाद्री,औरंगाबादची साक्षी चितलांगे, पश्चिम बंगालची ब्रिष्टी मुखर्जी, तामिळनाडूची व्ही.रिंधिया व तामिळनाडूची सी. संयुक्ता या नऊजणी चार गुणासह संयुक्तपणे तृतीय स्थानावर आहेत.
जागतिक बुद्धिबळ संघटना अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना व कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटना यांच्या मान्यतेने चेस असोसिएशन कोल्हापूरने आयोजित केलेल्या या स्पर्धा दिल्लीच्या एम पी एल स्पोर्ट्स फाउंडेशनने प्रायोजित केले आहेत तर संजय घोडावत युनिव्हर्सिटी सह प्रायोजक आहे.चितळे डेअरी,जैन इरिगेशन जळगाव,एच टू इ सिस्टीम पुणे व फिरोदीया ग्रुप,अहमदनगर हे सहयोगी प्रायोजक आहेत.
पहिल्या पटावर चार गुणांसह आघाडीवर असणाऱ्या औरंगाबादची महिला आंतरराष्ट्रीय मास्टर साक्षी चितलांगे व मुंबईची आंतरराष्ट्रीय महिला मास्टर आश्ना मखीजा यांच्यातील क्वीन्स गॅम्बिट एक्सेप्टेड प्रकारणे झाली. सर्वांचीच उत्सुकता लागलेल्या या लढतीत काळ्या मोहऱ्या घेऊन खेळणाऱ्या आश्नाने साक्षीच्या वजीराकडील कमकुवत झालेल्या प्याद्यांवर उंट व वजीराच्या कल्पक चाली रचत प्याद्याची बढत घेतली. अंतिम पर्वात हत्ती व अश्वाच्या मदतीने प्याद्याचे वजीरात रूपांतर करण्यास सुरुवात करत 57 व्या चालीला विजय संपादन करत अश्ना ने स्पर्धेत पाच गुणांसह आघाडी घेतली.
दुसऱ्या पटावर नागपूरची गतविजेती महिला ग्रँडमास्टर दिव्या देशमुख व अग्रमानांकित दिल्लीची महिला ग्रँडमास्टर वंतिका अग्रवाल यांच्यातील सिसिलियन रुसोलिमो प्रकाराने प्रेक्षणीय लढतीत दोघांनी तोडीस तोड चाली रचत डावर वर्चस्व मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. दीर्घकाळ चाललेली लढत 63 व्या चाली अखेर बरोबरीत सुटली.
तिसऱ्या पटावर पेट्रोलियम स्पोर्ट्सच्या महिला ग्रँडमास्टर मेरी आना गोम्स व महाराष्ट्राची महिला फिडे मास्टर विश्वा शहा यांच्यात कॅटलन ओपनिंगने डावाची सुरुवात झाली. मेरीने डावाच्या मध्यात आक्रमक चाली रचत विश्वावर दडपण निर्माण केले. आयुर्विमा महामंडळाच्या महिला ग्रँडमास्टर किरण मोहंतीने राजा समोरील प्याद्याने केलेल्या सुरुवातीच्या चालीला पेट्रोलियम स्पोर्टच्या आंतरराष्ट्रीय मास्टर सौम्या स्वामीनाथन हिने फ्रेन्च बचाव पद्धतीचा अवलंब केला. अतिशय गुंतागुंतीच्या झालेल्या या डावात किरण ने अठराव्या चालीला प्याद्याची चुकीची खेळी केल्याने त्याचा अचूक फायदा अनुभवी सौम्याने अश्वाचे उत्कृष्ट बलिदान देत राजावर प्रखर हल्ला चढविला व किरणला तिसाव्या चालीला डाव सोडण्याचा भाग पाडले.
तेलंगणाची सई पोटलुरी व आंतरराष्ट्रीय मास्टर गोव्याची भक्ती कुलकर्णी यांच्यातील क्वीन्स गॅम्बिट एक्सचेंज व्हेरिएशनने झालेल्या डावात भक्तिने आपल्या लौकिकास साजेसा तंत्रशुद्ध खेळ करत डावावर पूर्णपणे वर्चस्व राखत ५३ व्या चालीला विजय मिळवला. केरळच्या कल्याणी सिरीन हिने महिला आंतरराष्ट्रीय मास्टर तेजस्विनी सागर हिला अनपेक्षितरित्या बरोबरीत रोखत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.