no images were found
अल्पसंख्याक शाळांमधील पदभरती शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वी : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर
नागपूर : राज्यातील अल्पसंख्याक समाजाचे शैक्षणिक धोरण तयार करण्यासाठी नेमलेल्या अभ्यासगटाचा अहवाल प्राप्त झाला आहे. याबाबत आर्थिक बाबी तपासून शिफारशी स्वीकारण्याची कार्यवाही करू. त्याचबरोबर अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक संस्थांमधील, शाळांमधील पदभरती हे शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वी करण्याची ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत दिली.
अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक धोरणाबाबत अभ्यासगटाने सादर केलेल्या अहवालाबाबत सदस्य डॉ. वजाहत मिर्झा यांनी प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न उपस्थित केला होता. प्रश्नाला उत्तर देताना मंत्री श्री. केसरकर बोलत होते. मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले की, अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक धोरणाबाबत अभ्यासगटाच्या शिफारशी शासनाला सादर झाल्या आहेत. याबाबत योजना शिक्षण संचालक यांच्याकडून आर्थिक बाबींचा सविस्तर माहिती मागविली आहे. सध्या 50 टक्के पदभरती करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून आधार लिंकद्वारे विद्यार्थीसंख्या समजल्यानंतर पुढील 30 टक्के पदभरती करण्यात येईल. अल्पसंख्याक शाळांप्रमाणे अल्पभाषिक शाळांचीही पदभरती करू. यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य सर्वश्री एकनाथ खडसे, डॉ. सुधीर तांबे, विक्रम काळे यांनी उपप्रश्न उपस्थितीत करून सहभाग घेतला.