no images were found
जलसंपदा विभागाच्या माध्यमातून बोंडारवाडी प्रकल्प पूर्ण करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : “सातारा जिल्ह्यातील नियोजित बोंडारवाडी प्रकल्प जलसंपदा विभागाच्या माध्यमातून घेण्यात येईल. त्याचा आराखडा तयार करण्यासाठी जलसंपदा विभाग निधी उपलब्ध करून देईल”, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.
विधानसभेत सदस्य शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. त्यांनी सांगितले की, नियोजित बोंडारवाडी प्रकल्प हा कण्हेर प्रकल्पाच्या जलाशयाच्या वरच्या भागातील जावळी तालुक्यातील ५४ गावांना पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्तावित आहे. त्याची क्षमता ०.२० टीएमसी एवढी आहे. बोंडारवाडी योजना ही कन्हेर धरणापासून २८ किलोमीटरवर वरच्या बाजूस वेण्णा तलावाच्या खालील बाजूस बोंडारवाडी गावाजवळ प्रस्तावित आहे, असेही त्यांनी सांगितले.