no images were found
कोल्हापूर स्थानकातून रेल्वेसेवा पूर्ववत; विस्तारित प्लॅटफाॅर्मचा वापर सुरु
कोल्हपूर : येथील श्री. छत्रपती शाहू महाराज टर्मिनसवर मेगा ट्रॅफिक ब्लॉक बुधवारी रात्री संपल्याने रेल्वेसेवा पूर्ववत झाली आहे. चार नंबरच्या प्लॅटफॉर्मचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी आणि विद्यमान दोन प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्यासाठी कोल्हापूर रेल्वे स्थानकात मेगा ब्लॉक घेण्यात आला होता. नॉन इंटरलॉकिंग प्रणालीसह काम पूर्ण झाले आहे. गुरुवारी कोल्हापूर-मुंबई एक्स्प्रेस आणि कोल्हापूर-पुणे पॅसेंजर ट्रेन या दोन अपवाद वगळता सर्व गाड्या वेळापत्रकानुसार धावल्या.
स्टेशन प्रबंधक विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारपासून १०० टक्के सर्व नियोजित गाड्या टर्मिनसवर येतील आणि सुटतील. बांधलेले नवीन प्लॅटफाॅर्म लवकरच लोकांसाठी खुले केले जाईल. शाहू टर्मिनसवरून दररोज १५ गाड्या धावतात, त्यात ५ एक्स्प्रेस गाड्यांचा समावेश आहे. श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावरील नवा प्लॅटफॉर्म क्रमांक चारचा वापर गुरुवारपासून प्रत्यक्ष सुरू करण्यात आल्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास कोल्हापूर कलबुर्गी एक्स्प्रेस सुटली. या प्लॅटफॉर्ममुळे स्थानकातून नव्या रेल्वे सुरू होण्याचा मार्गाचा मोकळा झाला आहे. या प्लॅटफॉर्मच्या निर्मितीचे काम २०१९ मध्ये सुरु करण्यात आले होते. मात्र, कोरोना महामारीने काम थांबल्याने गेल्या वर्षभरापासून वेगाने पुन्हा काम सुरू करण्यात आले होते. या कामाचा अंतिम टप्पा पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेने २१ डिसेंबरपासून आठ दिवसांचा मेगा ब्लॉक घेतला. मेगा ब्लॉक बुधवारी रात्री संपला.
गुरुवारी रेल्वेच्या पुणे येथील अभियांत्रिक विभागातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी मालवाहतूक रेल्वेच्या माध्यमातून या प्लॅटफॉर्मची चाचणी केली ती यशस्वी झाल्यानंतर कोल्हापूर कलबुर्गी एक्सप्रेस सोडण्यात आली. या प्लॅटफॉर्मवर आता २४ डब्यांची रेल्वे थांबू शकेल. सध्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि दोनच्या विस्तारीकरणाचे काम वेगाने सुरू असल्याने स्थानकाची क्षमता वाढणार आहे. विस्तार केलेल्या प्लॅटफॉर्मवर शेडची उभारणी आणि विद्युतीकरणाचे काम लवकरात लवकर काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे प्रबंधक विजयकुमार यांनी सांगितले. दुसरीकडे, प्लॅटफॉर्मची संख्या चार झाल्याने अडचण कमी होणार आहेत. तसेच रेल्वेचे इंजिन वळविण्यातील वेळ वाचणार आहे.