no images were found
रामटेकळी येथील कोल्हापूरी बंधाऱ्याचे जूनमध्ये लोकार्पण – मंत्री डॉ. तानाजी सावंत
नागपूर : “रामटेकळी (ता. मानवत, जि. परभणी) येथील कोल्हापूरी बंधारा क्र.३ चे ८० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. येत्या जून २०२३ मध्ये बंधाऱ्याचे लोकार्पण करण्यात येईल”, अशी माहिती मंत्री डॅा. तानाजी सावंत यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
या बंधाऱ्याच्या कामांची चौकशी करण्याबाबत सदस्य अब्दुल्लाखान दुर्राणी, विक्रम काळे, शशिकांत शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यात एकनाथ खडसे, अनिल परब आणि जयंत पाटील यांनी सहभाग घेवून उपप्रश्न उपस्थित केले.
मंत्री डॅा.तानाजी सावंत म्हणाले, “परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील रामटेकळी येथील कोल्हापूरी बंधाऱ्याच्या बांधकामाचे कार्य आदेश सप्टेंबर २०१९ मध्ये देण्यात आले होते. मध्यंतरी कोरोना काळात काम थांबले होते. कंत्राटदाराने उपविभागाकडून कामाची आखणी करून न घेता परस्पर दुसऱ्या ठिकाणी काम सुरु केले. ही बाब निदर्शनास येताच काम थांबविण्यात आले. याबाबत कंत्राटदार आणि उप अभियंत्यांना नोटिस पाठविण्यात आल्या आहेत. याप्रकरणी शासनाचा निधी वाया गेला नसून शासनाचे कुठलेही नुकसान झाले नाही. तथापि या कामातील हलगर्जीपणाबाबत चौकशी करण्यात येईल. या चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कार्रवाई केली जाईल”, असेही मंत्री डॅा. सावंत यांनी सभागृहात उत्तर देतांना सांगितले.