
no images were found
ग्राहकांनी आपल्या हक्काबाबत अधिक जागरुक रहावे –प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे
24 डिसेंबर या राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त भवानी मंडप येथे विविध विभागाच्या जनजागृतीपर स्टॉलचे उद्घाटन
कोल्हापूर : संपूर्ण देशभरात 24 डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो. या दिनाचे औचित्य साधून ग्राहकांना त्यांच्या हक्का विषयीची सविस्तर माहिती देण्यात येते. ग्राहकांनी ही माहिती घेऊन आपल्या हक्काविषयी अधिक जागरुक रहावे व कोणत्याही प्रकारची स्वतःची फसवणूक होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केले.
राष्ट्रीय ग्राहक दिन 24 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येत असतो त्यानिमित्त जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने भवानी मंडप येथे आयोजित कार्यक्रमात श्री. शिंदे मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षा सविता भोसले, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, वैद्य मापन शास्त्र विभागाचे उपनियंत्रक आर. एन. गायकवाड, अन्न व औषध कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त मोहन केंबळकर, अन्नधान्य वितरण अधिकारी डी.बी.सणगर, पुरवठा निरीक्षक गजानन पोवार व अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी श्री. शिंदे म्हणाले की, प्रत्येक नागरिक हा ग्राहक असतो. त्यामुळे दैनंदिन व्यवहार करत असताना आपल्याला आपल्या हक्काविषयी जाणीव जागृती असली पाहिजे. वस्तू अथवा सेवा घेत असताना कोणत्याही प्रकारे एक ग्राहक म्हणून आपली फसवणूक होणार नाही याबाबत प्रत्येकाने योग्य ती दक्षता घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सुचित केले.
राष्ट्रीय ग्राहक संरक्षण कायद्यामुळे ग्राहकांना मोठे संरक्षण मिळाले असून वस्तू व सेवा खरेदी करत असताना आपल्या हक्काची जाणीव असेल तर ग्राहक हाच राजा आहे असे प्रतिपादन जिल्हा ग्राहक संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती भोसले यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. तसेच कोणत्याही वस्तूची अथवा सेवांची खरेदी करत असताना त्याबाबतचे पुरावे ग्राहकांनी जपून ठेवले पाहिजेत, असेही त्यांनी सुचित केले. यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री केंबळकर व वैद्य मापन शास्त्र विभागाचे उपनियंत्रक श्री. गायकवाड यांनी ग्राहकांच्या हक्काबाबत मार्गदर्शन केले.
शासकीय यंत्रणेचे मोठ्या प्रमाणावर ग्राहक असलेल्या शासकीय विभागाच्या विविध योजनांची व सेवांची माहिती देणारे मार्गदर्शनपर स्टॉल येथे लावण्यात आले आहेत. त्या स्टॉलचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्री. शिंदे व मान्यवरांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. या स्टॉलला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यावेळी ग्राहक चळवळीतील पदाधिकारी आणि ग्राहक उपस्थित होते. प्रारंभी जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. कवितके यांनी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्याचा उद्देश सांगितला. तर शेवटी या कार्यक्रमास उपस्थित मान्यवर व ग्राहकांचे श्रीमती सरस्वती पाटील यांनी आभार मानले.