no images were found
पन्हाळा पोलीस अधिकाऱ्याकडून महिला पोलिसाकडे शरीरसुखाची मागणी; कारवाई न केल्यास बाळासह आत्महत्येची धमकी
कोल्हापूर : पन्हाळा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने महिला कर्मचाऱ्याच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन थेट पोलीस ठाण्यात शरीरसुखाची मागणी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत पीडित महिला कर्मचाऱ्याने संबंधित अधिकाऱ्याविरोधात पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे गुरुवारी तक्रार दिली आहे. याबाबत कारवाई न झाल्यास माझ्या बाळाला घेऊन आत्महत्या करण्याशिवाय कोणताच पर्याय राहणार नाही, असा इशारा पीडितेने पत्राद्वारे पोलीस अधीक्षकांना दिला आहे.
सदर पीडित महिला गेल्या चार वर्षांपासून पन्हाळा पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. मात्र येथील अधिकारी तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत त्रास देत असल्याचं महिलेने तक्रारीत म्हटलं आहे. मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने रोज सकाळी तोकड्या चड्डीत ते पोलीस ठाण्यात येऊन अनावश्यक प्रश्न विचारणे, लज्जा उत्पन्न होईल असे भाष्य करणे व वर्तन करणे असे प्रकार करत असून माझ्याकडे त्याने वारंवार शरीरसुखाची मागणी केली असल्याचे आरोप महिला पोलीस कर्मचाऱ्याने केले आहेत.
या प्रकरणात पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालून तातडीने कारवाई करावी, अन्यथा झालेला सर्व प्रकार व्हॉट्सअपवरील सर्व ग्रुपवर तसंच वरिष्ठ कार्यालय मंत्रालय आणि महिला आयोग यांना पाठवून मी माझ्या बाळाला घेऊन आत्महत्या करण्याशिवाय माझ्याकडे कोणताच पर्याय राहणार नाही, असा इशारा पीडितेने पत्राद्वारे पोलीस अधीक्षकांना दिला आहे. याप्रकरणी आता काय कारवाई केली जाते याकडे लक्ष लागून राहिले आहे.