no images were found
गोकुळकडून ग्राहकासाठी सुगंधित दुधाची निर्मिती ! चार फ्लेवरमध्ये उपलब्ध !
कोल्हापूर : उच्चतम दर्जाचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची दर्जेदार निर्मिती ही वैशिष्ट्य असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) आता ग्राहकांची मागणी व बाजारपेठेचा विचार करून सुगंधित दुधाची निर्मिती केली आहे. स्ट्रॉबेरी, पिस्ता, व्हेनिला व चॉकलेट अशा चार फ्लेवर मध्ये सुगंधित दूध (फ्लेवर मिल्क)उपलब्ध आहे. 200 मिली लिटर पेटजार बॉटलमध्ये सुगंधित दूध विक्रीसाठी उपलब्ध आहे.
राष्ट्रवादीचे नेते व आमदार हसन मुश्रीफ, काँग्रेसचे नेते व आमदार सतेज पाटील, गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांच्यासह संचालक मंडळाच्या उपस्थितीत सुगंधित दुधाचे लॉन्चिंग करण्यात आले. ताराबाई पार्क येथील गोकुळच्या कार्यालयात गुरुवारी सायंकाळी सुगंधित दूध वितरित करण्याचा कार्यक्रम झाला. चेअरमन विश्वास पाटील म्हणाले, “गेल्या काही वर्षापासून ग्राहकाकडून फ्लेवर मिल्कची मागणी होत होती. ग्राहकांची ही मागणी विचारात घेऊन गोकुळच्या संचालक मंडळांनी 200 मिली लिटर पेटजार बॉटलमध्ये फ्लेवर मिल्कची निर्मिती केली आहे. हे सुगंधित दूध गोकुळच्या उच्च दर्जाच्या व नैसर्गिक दुधापासून बनविले आहे. सुगंधी दूध डबल कोंड दुधापासून तयार केले आहे. त्यावर उच्च दर्जाची प्रक्रिया केल्यामुळे हे दूध 180 दिवस टिकणार आहे.” आमदार सतेज पाटील म्हणाले, ” गोकुळ हा एक ब्रँड आहे. दुधाच्या अधिकाधिक विक्रीसह उपपदार्थांची निर्मिती यावर फोकस राहील. दुधापासून बनवण्यात येणाऱ्या पदार्थांना देशभरात मोठी मागणी आहे. येत्या पाच वर्षांमध्ये संपूर्ण देशभरात दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीची उलाढाल बारा हजार कोटीपर्यंत होईल असा अभ्यासकांचा अंदाज आहे. दुग्धजन्य पदार्थांच्या या मार्केटमध्ये गोकुळचा दबदबा निर्माण व्हावा हा आमचा प्रयत्न आहे.” आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, ” दूध उत्पादकांना न्याय देताना गोकुळने आता दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीवर लक्ष दिले आहे. गोकुळचे वेगवेगळे पदार्थ नक्कीच ग्राहकांच्या पसंती उतरतील. गोकुळने भविष्यकाळात आईस्क्रीम निर्मितीकडे वळावे.” कार्यकारी संचालक योगेश गोडबोले म्हणाले, ” सुगंधित दुधाची निर्मिती करताना सगळ्या गोष्टींची खबरदारी घेतली आहे. हे दूध आरोग्यास अपायकारक होणार नाही अशा पद्धतीने प्रक्रिया केली आहे. सुगंधित दूध हे लहान मुलांसाठीही उपयुक्त ठरेल”
पत्रकार परिषदेला ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, सुजित मिणचेकर, शशिकांत पाटील-चुयेकर, बाळासाहेब खाडे, चेतन नरके, अजित नरके बाबासो चौगुले, करणसिंह गायकवाड, बयाजी शेळके प्रा. किसन चौगुले, मोरे, मार्केटिंग विभागाचे हणमंत पाटील आदी उपस्थित होते.