अतिक्रमण कालमर्यादेत हटवा आणि ज्या अधिकार्यांच्या कालावधीत अतिक्रमण झाले त्यांच्यावर कारवाई व्हावी- विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृती समिती
कोल्हापूर : विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीने पत्रकार परिषद, आंदोलन, लोकप्रतिनिधींच्या भेटी यांसह विशाळगडावर झालेले अतिक्रमण पुराव्यांसहित समोर आणले. यानंतर जिल्हाधिकारी, पुरातत्व विभागाचे अधिकारी, पन्हाळा आणि शाहूवाडी येथील तहसीलदार आणि गटविकास अधिकारी, तसेच वन विभागाचे अधिकारी यांच्यासमवेत कृती समितीच्या बैठका झाल्या. या बैठकांमध्ये जिल्हाधिकारी यांच्यासह सर्वांनीच हे अतिक्रमण झाल्याचे मान्य केले. यानंतर संबंधितांना नोटिसा काढण्यात आल्या. नोटिसा निघाल्यानंतरही पावसाळ्याचे कारण पुढे करत जिल्हाधिकार्यांनी कारवाई करू शकत नाही, असे सांगितले. दरम्यानच्या कालावधीत विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनीही त्यांच्या स्तरावर हा विषय लावून धरला आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या जिल्हाधिकारी यांच्या समवेत झालेल्या बैठकीनंतर ही कारवाई चालू झाली. आता यापुढील काळात तरी प्रशासनाने शिवभक्त, गडप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांच्या भावनांचा अंत होण्याची वाट पाहू नये. विशाळगडावरील अतिक्रमण हे कुणाचाही मुलाहिजा न बाळगता हटवणे अपेक्षित आहे. त्याच समवेत ज्या ज्या अधिकार्यांच्या कालावधीत हे अतिक्रमण झाले ते पुरातत्व विभागाचे अधिकारी किंवा संबंधित प्रशासनाचे जे अधिकारी यांच्यावरही दिरंगाई केल्याविषयी कारवाई व्हावी, तसेच जे अधिकारी सेवानिवृत्त झाले त्यांच्या वैयक्तीक मालमत्तेतून हानीभरपाई वसूल करावी, अशी मागणी विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृती समितीचे श्री. मनोज खाडये यांनी केली आहे.
या प्रसंगी विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृती समितीचे सदस्य श्री. प्रमोद सावंत, श्री. किशोर घाटगे, श्री. राजू यादव, श्री. रणजित घरपणकर, श्री. बाबासाहेब भोपळे, श्री. किरण दुसे उपस्थित होते.