
no images were found
मेडीकल कॉलेजची विद्यार्थीनी नव्हे, ती तर अंडरकव्हर पोलिस कॉन्स्टेबल
इंदोर : येथील मेडीकल कॉलेजमध्ये एक तरुणी मागील दोन महिन्यांपासून कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये सातत्याने दिसत होती. पांढऱ्या रंगाचा कोट परिधान करून तिने इतर विद्यार्थ्यांप्रमाणे तासनतास कँटीनमध्ये बसून वेगवेगळ्या गटातील विद्यार्थ्यांशी सवाल साधला. मात्र ही मेडीकल कॉलेजची विद्यार्थीनी नव्हती, तर कॉलेजमध्ये होत असलेल्या रॅगिंग प्रकरणाचा छडा लावणारी अंडरकव्हर पोलिस कॉन्स्टेबल होती.
२५ वर्षीय शालिनी चौहान ही मध्य प्रदेशातील इंदूर येथील महात्मा गांधी मेमोरियल मेडिकल कॉलेजमध्ये (एमजीएमएमसी) एका रॅगिंग प्रकरणाचा छडा लावण्यासाठी गुप्तपणे काम करत होती. कँटीनमध्ये वेळ घालवून तिने अनेकांना बोलत केलं. त्यातून पीडित विद्यार्थी बोलण्यासाठी समोर आले. त्यामुळे रॅगिंग करणाऱ्या ११ विद्यार्थ्यांना अटक करण्यात यश आलं.
या कामगिरीबाबत शालिनी चौहानने सांगितले की, कॉलेजमध्ये वेळ घालवण्यासाठी मी कँटीनची निवड केली कारण तिथे कोण जेवण करत, कोण गप्पा मारतं याची विद्यार्थ्यांना काळजी नसते. शिवाय कँटीनमध्ये ओळखपत्राची तपासणी केली जात नाही. मात्र हे काही सोपं नव्हतं. अनेकदा मला काळजी वाटायची, की माझं सत्य समोर येईल.शालिनीने पुढं म्हटलं की, सुरुवातीला काही विद्यार्थ्यांना माझ्यावर संशय आला. त्यामुळे मला भीती वाटायची की, मी कोण आहे, हे जर त्यांना कळलं, तर संपूर्ण प्रकरणाचा तपास धोक्यात येईल. मी विद्यार्थ्यांच्या विविध गटांमध्ये सामील झाले. मी कोणत्या वर्षात आहे, कुठून आले, वेगवेगळ्या गोष्टी सांगत असे, शालिनीने सांगितलं.
याच वर्षी जुलै महिन्यात नवी दिल्लीतील एका अँटी रॅगिंग हेल्पलाइनला इंदौरहून फोन आला होता. तक्रारदारांने म्हटलं होतं की, एमजीएमसीमधील सिनीयर विद्यार्थ्यांचा एक गट त्याला खोल्यांमध्ये बोलवतो. त्यानंतर त्याला शिवीगाळ करत मारहाण करण्यात येते. तसेच सिनीयर्सने त्याला वर्गातील विद्यार्थीनींना त्रास देण्याशिवाय, उशीसोबत सेक्स ऍक्ट करण्यास भाग पाडले. मात्र, सूडाच्या भीतीने तक्रारदार विद्यार्थ्याने स्वत:बद्दल आणि त्यांच्या कथित रॅगिंगबद्दल अधिक माहिती उघड केली नाही. या तक्रारीनंतर संयोगिता गंज पोलिसांच्या पथकाने महाविद्यालयात भेट दिली. मात्र काहीच प्रोग्रेस झाली नाही. अखेरीस पोलिसांनी सप्टेंबरमध्ये एक योजना आखली. त्यासाठी एक गट तयार केली. यामध्ये गुप्तपणे तपास करण्यासाठी चौहानची विद्यार्थी म्हणून कॉलेजमध्ये जाण्यासाठी नियुक्ती केली. त्यानुसार शालिनी विद्यार्थी म्हणून गेली. तर काही पुरुष पोलिसांना कॅम्पसमधील शालिनीच्या आजूबाजूला वेळ घालवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. तर काही पोलिस कँटीनमध्ये कामगार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. दरम्यान रॅगिंग प्रकरणात पोलिसांना यश आले आणि ११ विद्यार्थ्यांना भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) विविध कलमांखाली अटक करण्यात आली.