no images were found
‘चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करणाऱ्यांची हत्तीवरुन मिरवणूक काढणार
सांगली : मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्या मनोज गडबडे व त्याचे छायाचित्रण करणारे पत्रकार गोविंद वाकडे यांची हत्तीवरुन मिरवणूक काढण्याचा निर्णय डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडियानं घेतला आहे. सांगलीत 23 डिसेंबरला जाहीर सत्कार करणार असल्याचं अध्यक्ष प्रा. सुकुमार कांबळे यांनी सांगितलं. पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक प्रकरणानंतर या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्याचा संघटनेतर्फे निषेध करण्यात आला. प्रा. कांबळे म्हणाले, चंद्रकांत पाटलांनी अटकेची कारवाई करुन लोकशाहीलाच आव्हान दिलंय. महापुरुषांबद्दल अवमानास्पद वक्तव्य करुन मानसिकता स्पष्ट केलीय, त्यामुळंच शाई फेकून त्यांचा निषेध करणाऱ्या गडबडे यांचं आम्ही अभिनंदन करणार आहोत. 23 डिसेंबरला सांगलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मिरवणुकीला सुरुवात होईल. त्यानंतर अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ सांगता होईल. तद्नंतर शाईफेक करणारे गडबडे, विजय होवाळ, आकाश इजद व पत्रकार गोविंद वाकडे यांचा सत्कार केला जाईल, असंही प्रा. कांबळेंनी स्पष्ट केलं.
डॉ. आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल मंत्री चंद्रकांत पाटलांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी देखील चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सूर्यासारखे आहेत आणि जर सूर्यावर थुंकायचा प्रयत्न केला तर ती थुंकी त्याच्याच तोंडावर पडते. मला वाटते काल परवा ती थुंकी काळ्या शाईच्या रुपात चंद्रकांत पाटलाच्या तोंडावर पडली, अशी त्यांनी टीका केली.