no images were found
लोककलावंतांच्या कलेला वाव देण्यासाठी जिल्ह्यात लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन
महाविजेत्यांना दीड लाख रुपयांची पारितोषिके
कोल्हापूर : कोल्हापूरातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या हौशी महिलांनी एकत्र येवून, नटराज डान्स स्टुडिओची सुरवात केली आहे. या स्टुडिओच्या वतीने सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. शहर आणि ग्रामीण भागातील लोप पावत चाललेली लोककला पुनरूज्जीवित व्हावी आणि लोककलाकारांना आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्याची संधी मिळावी, यासाठी नटराज स्टुडिओच्यावतीने शहर आणि ग्रामीण भागात तालुकास्तरीय लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्राथमिक फेरीतील विजेत्यांची महाअंतिम स्पर्धा होवून, त्यातील विजेत्यांना एकूण दीड लाख रूपयांची बक्षिसे आणि सन्मानचिन्ह दिले जाणार आहे, अशी माहिती मिसेस इंडिया किताब विजेत्या सौ. राजेश्वरी मोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूरच्या रांगड्या मातीमध्ये प्रथमच भव्य प्रमाणात लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शोध लोककलेचा वारसा कलावंताचा, हे ब्रीद वाक्य घेवून नटराज स्टुडिओतर्फे तालुकास्तरीय स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्यामध्ये २ जानेवारीला गडहिंग्लज, ८ जानेवारीला राधानगरी, १६ जानेवारीला गारगोटी, २२ जानेवारीला इचलकरंजी (हातकणंगले-शिरोळ), २८ जानेवारीला पोर्ले, २९ जानेवारीला गगनबावडा, ५ फेब्रुवारी रोजी कागल, १२ फेब्रुवारी रोजी नेसरी, २० फेब्रुवारीला बांबवडे आणि २६ फेब्रुवारीला सांगरूळमध्ये तालुकास्तरीय लोकनृत्य स्पर्धेची प्राथमिक फेरी होणार आहे. त्याचप्रमाणे शहर स्तरावरील स्पर्धेची प्राथमिक फेरी १८ डिसेंबरला कोल्हापुरातील देवल क्लबमध्ये होणार असून, त्याचा शुभारंभ भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांच्या हस्ते तसंच नृत्य प्रशिक्षक दिपक बिडकर, शाहीर आझाद नायकवडी, सिनेअभिनेत्री हेमसुवर्णा मिरजकर, एन डी चौगुले आणि संजय पटवर्धन यांच्या उपस्थितीत होणार आहे. तालुका आणि शहर स्तरावरील स्पर्धा वैयक्तीक लोकनृत्य आणि सांघिक लोकनृत्य अशा दोन गटात होणार असून, प्रत्येक गटातील अनुक्रमे ३ विजेते महाअंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. ही महाअंतिम फेरी मार्च २०२३ मध्ये कोल्हापुरात दिमाखदार सोहळ्याद्वारे रंगणार आहे. त्यातून वैयक्तीक लोकनृत्य गटात ३ आणि सांघिक गटात ३ महाविजेते घोषित केले जाणार आहेत, असे राजेश्वरी मोटे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला रेणूका केकतपुरे, नृत्य दिग्दर्शक अक्षय कदम, अभिनेते एन डी चौगले उपस्थित होते.