
no images were found
भाषा हे संस्कृतीचे द्योतक : डॉ. देवराळकर
कोल्हापूर : भाषा ही अनेक संदर्भ घेऊन येत असते .भाषांतर करताना भाषांतरकाराला दोन्ही भाषांची संस्कृती माहित असणे आवश्यक आहे.त्यामुळे भाषा हे संस्कृतीचे द्योतक आहे, असे प्रतिपादन अमरावती येथील शासकीय विदर्भ ज्ञान – विज्ञान संस्थेच्या इंग्रजी विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.धनंजय देवराळकर यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभाग आणि दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली यांचा उपक्रम “भारतीय भाषा उत्सव “ अंतर्गत भाषांतराचे सांस्कृतिक महत्व या विशेष ऑनलाईन व्याख्यानात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे प्र.कुलसचिव डॉ.व्ही.एन.शिंदे होते. यावेळी मराठी विभागप्रमुख डॉ.नंदकुमार मोरे यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी संचालक प्रा.डॉ.डी.के.मोरे, उपकुलसचिव डॉ.एन.जे.बनसोडे,श्री.सी.एस.कोतमिरे उपस्थित होते.
डॉ. देवराळकर म्हणाले की, भाषा हे मानवाला मिळालेले वरदान आहे.विचार जतन करण्यासाठी भाषेचा वापर मनुष्य करीत आहे.भाषांतर आणि संस्कृती यांचा जवळचा संबंध आहे.इतर भाषा समजून घेण्यासाठी ती भाषा येणे व तेथील संस्कृती माहित असणे आवश्यक आहे.सध्या बदलत्या विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे भाषांतरामध्ये अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.नव्या शैक्षणिक धोरणानुसार स्थानिक भाषेला महत्व दिलेले आहे त्यामुळे मराठी भाषा ही ज्ञान भाषा झाली पाहिजे.भाषा हे संस्कृतीचे मोठे वाहक आहे.याचे महत्व भाषांतरकारांनी ओळखले पाहिजे.
प्रास्ताविक व स्वागत समन्वयक डॉ.के.बी.पाटील यांनी केले व प्रमुख पाहुण्यांचा परिचय सहा.प्राध्यापक श्री.पी.एस.कांबळे यांनी करून दिला.सूत्रसंचालन डॉ.पी.एस.लोंढे यांनी केले, आभार डॉ.चांगदेव बंडगर यांनी मानले. या व्याख्यानासाठी दूर शिक्षणाचे व मराठी अधिविभागाचे विद्यार्थी,समन्वयक व सहा.प्राध्यापक बहुसंख्येने ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते.