no images were found
स्तुति कार्यक्रमचा समारोप कार्यक्रम संपन्न
शिक्षणतज्ज्ञांनी एकत्र येऊन देशासाठी द्यावे योगदान डॉ. व्हि. एन. शिंदे
कोल्हापूर : भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभाग प्रायोजित अत्याधुनिक विश्लेषणात्मक उपकरण प्रशिक्षण कार्यशाळा शिवाजी विद्यापीठातील सैफ डी एस टी – सी एफ सी विभागात दि. ५ ते ११ डिसेंबर २०२२ दरम्यान संपन्न झाली. स्टार्ट अप इंडिया आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा अंतर्गत देशातील वेगवेगळ्या नामांकित संस्थेतून आलेल्या संशोधकांना या विभागामधील अत्याधुनिक उपकरणांची प्रत्यक्ष प्रात्यक्षिके देण्यात आली, तसेच देशातील नामवंत प्राध्यापक, वैज्ञानिक यांचे बहुमलाचे मार्गदर्शन मिळाले.
या प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी मुंबई विद्यापीठाचे डॉ. प्रदीप सरवदे यांनी ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप (TEM) या उपकरणाविषयी सविस्तर माहिती दिली. या व्याख्यानमालेतील शेवटचे पुष्प गुंफताना शिवाजी विद्यापीठाच्या नॅनो टेक्नॉलॉजी विभागाचे चे डॉ. टी. डी. डोंगळे यांनी इलेक्ट्रिक मेजरमेंट टेक्निक्स अर्थात विद्युत मापन तंत्रे या विषयी मोलाचे मार्गदर्शन केले.
गेले ७ दिवस या व्याख्यानमालेतून दिल्ली, बंगलोर, मुंबई अशा प्रकारे देशातील विविध भागातून एकूण १४ तज्ज्ञांची व्याख्याने सहभागीना ऐकायला मिळाली.
कार्यशाळेसाठी आलेल्या संशोधक विद्यार्थ्यांनी सदर प्रशिक्षणाचा आम्हाला चांगल्या प्रकारे संशोधनासाठी उपयोग होईल असे उद्गार काढले. त्याचबरोबर प्रशिक्षणाचा क्षीण घालविण्याकरिता सहभागींसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आणि अभ्यास सहलीचे देखील आयोजन केले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून शिवाजी विद्यापीठाचे रजिस्ट्रार डॉ. व्हि. एन. शिंदे, आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी च्या डीन प्रा. एस. एच. ठकार मॅडम उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डी. वाय. पाटील, तळसंदे येथील विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. के. प्रतापन यांनी उपस्थिती दर्शविली.
“शिक्षणतज्ज्ञांनी एकमेकांशी स्पर्धा करण्यापेक्षा एकत्र येऊन देशासाठी आपले योगदान दिले पाहिजे” असे मत शिवाजी विद्यापीठाचे रजिस्ट्रार डॉ. व्हि. एन. शिंदे यांनी व्यक्त केले. “या कार्यक्रमामध्ये अनेक अर्थाने विविधतेमध्ये एकता बघावयास मिळाली” असे शिवाजी विद्यापीठाच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी च्या डीन प्रा. एस. एच. ठकार यांनी आपल्या भाषणात नमूद केले. शिक्षणात आता अंतःविषय दृष्टीकोन असावा अशी अपेक्षा प्रमुख पाहुणे के. प्रतापन यांनी व्यक्त केली.
सदर कार्यशाळेसाठी स्तुति टीम मध्ये असणारे डॉ. टी. डी. डोंगळे, डॉ. के. डी. पवार, डॉ. मकसूद वाईकर, सौ. आदिती गर्गे, श्री. अजित कांबळे, सौ. विजया इंगळे, सौ. सुप्रिया साठे, सौ.गायत्री पवार यांना कार्यशाळा पार पाडण्यासाठी प्रा. सोनकवडे यांचे बहुमोलाचे मार्गदर्शन लाभले. गेल्या नऊ महिन्यापासून ही स्तुति च्या टीम ने १५ वेगवेगळ्या ठिकाणी असे कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडले आहेत. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्यशीला घोंगडे आणि प्रज्ञा राजे यांनी केले आणि डॉ. मकसूद वाईकर यांनी आभार मानले.
भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागामार्फत शिवाजी विद्यापीठाचे, वैज्ञानिक निर्मितीसाठी या स्तुती प्रकल्पामुळे चालना मिळत आहे. तसेच या प्रकल्पामुळे शिवाजी विद्यापीठाचा देशभर नावलौकिक वाढत आहे.