no images were found
खेरवाडी पोलीस ठाण्यात सिलेंडरचा भीषण स्फोट
पोलीस ठाण्यात अचानक सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे काहीकाळ मोठा गोंधळ उडाला. स्फोटामध्ये गंभीर जखमी झालेल्या २ पोलीस कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे.
मुंबई : खेरवाडी पोलीस ठाण्यामधील स्टोअर्स रूममध्ये ठेवण्यात आलेल्या सिलेंडरचा अचानक भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटामुळे दोन पोलीस कर्मचारी गंभीरीरित्या जखमी झाले. त्यांना ताबडतोब खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, मुंबईतील वांद्रे (पूर्व सरकारी वसाहत) या परिसरात खेरवाडी पोलीस ठाणे आहे. येथील पोलिसांकडून अवैधरित्या उभारण्यात आलेल्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर कारवाई केली जाते. या कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेल्या वस्तू येथील खेरवाडी पोलीस स्टेशनमधील स्टोअर रुममध्ये ठेवण्यात येते. अशा पद्धतीने नुकत्याच कारवाई झालेल्या एका खाद्यपदार्थ गाड्यावरील सिलेंडर स्टोअर्स रूममध्ये ठेवण्यात आला होता. याच सिलेंडरचा आज दुपारच्या सुमारास अचानक स्फोट झाला.
सिलेंडरच्या स्फोटामुळे पोलीस ठाण्यातील २ पोलीस कर्मचारी गंभीररित्या जखमी झाले. त्यांना ताबडतोब खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून परिस्थिती नियंत्रण आणण्यात येत आहे.