
no images were found
विद्यापीठाचा लौकिक सर्वदूर पसरविणारा ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ हरपला: कुलगुरू डॉ. शिर्के
कोल्हापूर : डॉ. जे.एफ. पाटील यांच्या निधनामुळे अर्थशास्त्राच्या क्षेत्रात शिवाजी विद्यापीठाचा लौकिक सर्वदूर पसरविणारा एक ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशी प्रतिक्रिया शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज येथे व्यक्त केली.
अर्थतज्ज्ञ डॉ. जे.एफ. पाटील यांच्या निधनाचे वृत्त समजताच शिवाजी विद्यापीठ परिवारावर काळाने अचानक घाला घातल्याची मनी आल्याची भावना व्यक्त करताना कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, डॉ. जे.एफ. पाटील म्हणजे सतत काळाच्या बरोबर चालणारे अर्थतज्ज्ञ होते. त्यांनी अनेक महत्त्वाच्या प्रासंगिक विषयांवर सातत्यपूर्ण लेखन करून संशोधकात आणि समाजात जागृती करीत राहण्याचे काम केले. अनेक संदर्भग्रंथांचे वाचन केले. भारतातील एक महत्त्वाचे अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी स्वतः नाव कमावलेच, पण त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठाचे नावही उंचावले. निवृत्तीनंतरच्या कालखंडातही ते सदोदित कार्यरत राहिले. शिवाजी विद्यापीठाचा साठ वर्षांचा इतिहास ग्रंथबद्ध करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीचे ते एक महत्त्वाचे सदस्य होते. त्यांनी हे काम पूर्ण करून विद्यापीठाकडे सुपूर्द केले आहे. त्यांच्या अर्थशास्त्रातील आणि शिक्षणातील योगदानाचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावनाही कुलगुरू डॉ. शिर्के यांनी व्यक्त केली.