no images were found
चंद्रपूरमध्ये सापडला जगातील सर्वात दुर्मिळ धातू
चंद्रपूर : हा जिल्हा खनिजे धातू आणि जीवाश्म यामुळे समृद्ध आहे. आता जिल्ह्यात सोन्याची खान आढळल्याची माहिती पुढे आली. या सोन्याच्या खाणीची जिल्ह्यात चर्चा आहे. मात्र बारा वर्षापूर्वी झालेल्या संशोधनात जिल्ह्याच्या भूगर्भात सोन्यापेक्षाही मौल्यवान असलेले प्लॅटिनम, दुर्मिळातील दुर्मिळ म्हणून ओळखले जाणारे रूथेनिअम, रोडीअम आणि इरेडियम धातू जिल्ह्याचा भूगर्भात पुरेशा प्रमाणात असल्याचे संशोधन झाले होते.
भूगर्भात दफन असलेल्या या मौल्यवान धातूंना बाहेर काढण्याची प्रक्रिया अद्यापही सुरू झालेली नाही. पॉयरोझिनाईट आणि गॅब्रो या संयुगात प्लॅटिनमचे ८९ ते १३५ पीपीबी इतके, तर पेंटालॅंडाईट या संयुगात सोन्याचे ०.२२ टक्के इतके प्रमाण आढळले. याशिवाय कोबाल्टचे प्रमाण ७२ ते १०० पीपीएम इतके आढळले. सोने आणि प्लॅटिनम असलेल्या खनिजांचे पट्टे एक ते दहा किलोमीटर लांब आणि एक मीटर ते १० मीटर रुंद असल्याचे शास्त्रज्ञांनी शोधनिबंधात म्हटले आहे. परिसरातील खनिजात लोह, तांबे आणि निकेलचे प्रमाण २९ ते ५९ टक्के इतके आढळले होते. देशभरात प्लॅटिनमची खनिजे अत्यल्प असून, परदेशातून आयात करूनच या खनिजांची गरज भागविली जाते. त्यामुळे गोंडपिंपरी येथील संशोधनाला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. या संशोधनाला बारा वर्षाच्या काळ उलटला असला तरी दुर्मिळ धातूंना बाहेर काढण्याचा प्रक्रियेवर कुठलीच हालचाल अद्याप झालेली नाही.