no images were found
मंदोस’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात तुरळक भागात पावसाची शक्यता
बंगालच्या उपसागरामध्ये बुधवार (दि.७) सकाळी ‘मंदोस’ या चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. हे चक्रीवादळ गुरुवारी (दि.८) तामिळनाडूच्या किनारपट्टीवर येण्याची शक्यता असल्यामुळे या भागातील १३ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जाहीर झाला आहे. दरम्यान महाराष्ट्रातील काही भागातही या चक्रीवादळाचे सावट येण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलेली आहे.
नैऋत्य बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ ‘मंदोस’ ला “मॅन-डौस” असं म्हंटलं जातं. हवामान विभागाने उत्तर तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि दक्षिण आंध्र प्रदेश किनारपट्टीसाठी चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. ९ डिसेंबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास ८५ किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह पुददुचेरी आणि श्रीहरिकोटा बेट ओलांडण्याची शक्यता असून या वादळाचा प्रभाव १० डिसेंबरपर्यंत राहील. १० रोजी रात्री त्याचे पुन्हा कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर होऊन ते शांत होईल. सध्या हे चक्रीवादळ श्रीलंकेपासून ५०० कि.मी., तर चेन्नईपासून ७७० कि.मी. अंतरावर आहे. आगामी ४८ तासांत ते तामिळनाडू, पुद्दुचेरी पार करून आंध्रप्रदेश किनारपट्टीवर येणार असल्याने दक्षिण भारतातील सर्वच किनारपट्ट्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ‘मंदोस’ चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रावरही होण्याची शक्यता असून या चक्रीवादळामुळे महाराष्ट्राकडे बाष्पयुक्त वारे येत असल्याने ढगाळ वातावरण तयार होऊन तुरळक भागांत पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.