
no images were found
श्रद्धा दुसऱ्या मुलासोबत डेटवर गेल्याने तिचा खून केला, आफताबची कबुली
नवी दिल्ली : दिल्लीमध्ये श्रद्धा वालकर या तरुणीची निर्घृण हत्या करून मृतदेहाचे ३५ तुकडे केल्याची भयानक घटना उघडकीस आली. आफताबनं चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितलं, की १७ मे रोजी श्रद्धा वालकर डेटवर गेल्यानं त्याला राग अनावर झाला होता. रागाच्या भरात त्यानं श्रद्धाचा खून केला. याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. आफताबनं यापूर्वी पोलिसांसमोर दावा केला होता, की त्याचं श्रद्धासोबत ब्रेकअप झालं होतं. ते रिलेशनशिपमध्ये नव्हते. दोघेही फ्लॅटमेट्स म्हणून एकत्र राहत होते. त्यानंतर त्यानं आणखी एक खुलासा केला, की १७ मे रोजी श्रद्धा ‘बंबल’ या डेटिंग अॅपवर ओळख झालेल्या व्यक्तीला भेटण्यासाठी गुरुग्रामला गेली होती. ती १८ मे रोजी दुपारी त्यांच्या मेहरौली इथल्या फ्लॅटवर परत आली. यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि संतापलेल्या आफताबनं तिचा खून केला.
आफताबनं दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी ‘बंबल’ला पत्र लिहून श्रद्धाच्या अकाउंटचे तपशील मागितले आहेत; पण मिळालेल्या उत्तरातला मजकूर पोलिसांनी अद्याप उघड केला नाही. नार्को-अॅनालिसिस टेस्टमध्ये आफताबनं सांगितलं, की बद्री नावाच्या मित्राच्या घरी गेल्यानंतर श्रद्धाच्या शरीराचे तुकडे मेहरौलीच्या जंगलात टाकण्याचा विचार सुचला. आफताबच्या मित्राचं घर जंगलाच्या जवळ आहे, त्यावरून त्याला ही कल्पना सुचली. बद्री दक्षिण दिल्लीतल्या छतरपूर पहाडी परिसरात आफताबच्या फ्लॅटजवळ राहत होता. आफताब आणि श्रद्धा हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधून परतल्यानंतर बद्रीच्या याच घरी काही दिवस थांबले होते. बद्रीच्या घराजवळच्या वृक्षाच्छादित भाग पाहिल्यानंतर, श्रद्धाच्या शरीराचे तुकडे टाकण्यासाठी जंगलाची निवड केल्याचं आफताबने नार्को चाचणीदरम्यान कबूल केलं. त्यापूर्वी त्याने इंटरनेटवर निर्जन ठिकाणांचा शोधही घेतला होता, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
पॉलिग्राफ टेस्टदरम्यान आफताबनं पोलिसांना सांगितलं, की श्रद्धाचा गळा दाबून खून केल्यानंतर त्यानं काही तास विश्रांती घेतली. नंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी चायनीज चाकू वापरून त्याचे तुकडे केले. रात्री झोपण्यापूर्वी मृतदेहाच्या तुकड्यांतील रक्त वाहून जाऊ देण्यासाठी ते बाथरूममध्ये ठेवले. सकाळी उठल्यानंतर त्यानं शरीराचा उरलेला भाग कापला. आफताबनं काही दिवस शेफ म्हणून काम केलं होतं. त्यामुळे त्याला मांस चिरण्याची सवय होती. फॉरेन्सिक तपासणीत याची पडताळणी झाली आहे. फॉरेन्सिक तपासणीत चिनी चाकूचे वार आढळले होते. आफताब सध्या तिहारमधल्या तुरुंग क्रमांक 4 मध्ये आहे. त्याची न्यायालयीन कोठडी दोन दिवसांत संपणार आहे. आतापर्यंत, त्याच्या कुटुंबातल्या कोणीही त्याला भेटण्यासाठी तिहार प्रशासनाशी संपर्क साधलेला नाही. दिवसभर तो पुस्तकं वाचतो किंवा त्याच्या सेलमध्ये शांतपणे बसतो. काही वेळा तो त्याच्या सेलमधले इतर आरोपी खेळत असलेला बुद्धिबळाचा खेळ पाहतो. पोलीस सध्या डीएनए अॅनालिसिस आणि पॉलिग्राफ व नार्को रिपोर्ट्सची वाट पाहत आहेत. फॉरेन्सिक अधिकार्याने सांगितलं.