Home मनोरंजन कोण होणार करोडपतीच्या मंचावर रवी किशन यांनी माधुरीसमोर उलगडली दादांच्या विनोदाची खासियत

कोण होणार करोडपतीच्या मंचावर रवी किशन यांनी माधुरीसमोर उलगडली दादांच्या विनोदाची खासियत

0 second read
0
0
7

no images were found

कोण होणार करोडपतीच्या मंचावर रवी किशन यांनी माधुरीसमोर उलगडली दादांच्या विनोदाची खासियत

कोल्हापूर (प्रतिनिधी):- “दादा कोंडकेंचं काम कोणाला आवडत नाही?” सोनी मराठीच्या ‘कोण होणार करोडपती’च्या हॉटसीटवर दादांचा विषय निघताच रवी किशन यांनी माधुरी दीक्षितला विचारलं. कोण होणार करोडपतीच्या यावेळच्या विशेष भागात भोजपुरी अभिनेता आणि गोरखपूरचे खासदार रविकिशन यांनी हजेरी लावली. या भोजपुरी अभिनेत्यानं खेळाच्या फेऱ्यांदरम्यान दादांच्या विनोदावर भरभरून गप्पा मारल्या. स्वतःच्या नृत्यावरून होणारं ट्रोलिंग, तरुण चाहत्यांनी दिलेली भन्नाट नावं आणि प्रत्येक शॉटआधी २० लिटर दुधानं अंघोळ करण्याची अफवा, इत्यादी विषयांवर रविकिशन मनमोकळेपणानं व्यक्त झाले. हा विशेष भाग शनिवारी, २८ नोव्हेंबरला सोनी मराठी आणि सोनी लिववर प्रसारित होणार आहे.
‘सोंगाड्या’मध्ये दादांनी साकारलेला भाबडा नाम्या एखादं वाक्य अगदी निरागसपणे बोलून जायचा मात्र, त्यातली खोच प्रेक्षकांना बरोबर कळायची. दादांच्या संवादफेकीतल्या याच नेमकेपणाचं रवी किशन यांना विशेष कौतुक आहे. ते म्हणाले, “दादा कोंडके यांचं विनोदाचं टायमिंग, त्यांचा सिनेमा आणि त्यांचा विनोद हे सगळंच वेगळं होतं. लोकांनी त्यांच्या चित्रपटांचे वेगवेगळे अर्थ लावले, पण त्या चित्रपटांतून दादा खूप काही सांगून गेले आहेत. दादा कोंडकेंच्या विनोदात नेहमीच एक संदेश असायचा. एका अभिनेत्याला समजून घ्यायला स्वतः अभिनेता व्हावं लागतं.”
रवी किशन यांच्या स्वतःच्या चाहत्यांचा विषय निघाला, तेव्हा माधुरीनं त्यांना विचारलं, “काय, तुम्ही स्वतःचे रील्स पाहता?” आणि माधुरीनं त्यांना चाहत्यांनी त्यांना दिलेली तीन नावं सांगितली ‘नॅशनल क्रश’, ‘बिहारचा ब्रॅड पिट’ की ‘माई का लाल जॅक्सन’ आणि विचारलं, “यातलं कुठलं नाव तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतं?” त्यावर अवघ्या तीन महिन्यांत ‘जेन झी’नं आपल्याला इंटरनेटवर प्रसिद्ध केल्याचं रविकिशन म्हणाले. आवडत्या नावाबद्दल मात्र रवि किशन यांचं उत्तर साधं होतं. “चाहत्यांना जे नाव द्यायचंय ते देऊ देत. मी त्यांचा रवी किशन आहे.”
या लोकप्रियतेची सुरुवात मात्र काहीशी वेगळी होती. माधुरी आणि रवी किशन यांच्या ‘माँ बहन’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या सुमारास त्यांच्या नृत्याच्या क्लिप्सवरून त्यांची खिल्ली उडवली जात होती. हे ट्रोलिंग कधी खटकतं आणि कधी त्याची गंमत वाटते, असं माधुरीनं विचारल्यावर ते म्हणाले, “लोकांनी माझ्यावर लिंबं फेकली, मी त्यांचं सरबत केलं!” पुढे त्याच नृत्याचे मीम्स इतके फिरले की फोन उघडल्यावर स्वतःलाच पाहण्यात गंमत वाटू लागली, असं त्यांनी सांगितलं. ऑनलाइन प्रतिक्रियांची भीती वाटणाऱ्या तरुणांसाठी त्यांनी एका ओळीत आपलं म्हणणं मांडलं, “कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना.”
स्वतःबद्दलची कोणती अफवा ऐकून सगळ्यात जास्त हसू येतं, या माधुरीच्या प्रश्नावर रवी किशन यांना २० लिटर दुधाचा किस्सा आठवला. प्रत्येक शॉटआधी आपण गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या दुधानं अंघोळ करतो, असं लोक म्हणतात, हे सांगताना त्यांनी थेट माधुरीलाच साक्षी ठेवत या अफवांचं खंडन करायला सांगितलं. छठपूजेला गोरखपूरमध्ये रात्रभर वेगवेगळ्या घाटांवर लोकांना भेटून ते पहाटेच्या विमानाने मुंबईत चित्रीकरणासाठी आले होते. व्हॅनिटी व्हॅनमध्ये आपण तयार होतो, तेव्हा दूध आणि गुलाबाच्या पाकळ्या कुठे असतात, अशी मल्लिनाथी त्यांनी केली. त्यावर माधुरीनेही दोघांच्या चित्रीकरणाची आठवण सांगितली. “आपण चित्रपट करत होतो तेव्हा तुम्ही रात्रभर प्रवास करून यायचात आणि थेट शूटिंग करायचात.”
‘कोण होणार करोडपती’चा हा विशेष भाग शनिवारी, २८ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता सोनी मराठीवर आणि सोनी लिव वर पाहता येईल.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

मिसेस मुख्यमंत्री किडनॅप’ चित्रपटाची घोषणा,भाग्यश्री मोटे महत्त्वपूर्ण भूमिकेत

‘मिसेस मुख्यमंत्री किडनॅप’ चित्रपटाची घोषणा,भाग्यश्री मोटे महत्त्वपूर्ण भूमिकेत कोल्हापूर …