no images were found
रमणमळा परिसरात पुन्हा गवा आला
कोल्हापूर : शहरातील रमणमळा परिसरात उसाच्या फडात गव्यांच्या कळपाने वनविभागाची झोप उडवली आहे. मानवी वस्तीत गवे येऊ नयेत, यासाठी वनविभागाकडून डोळ्यात तेल घालून पहारा देण्यात येत असला, तरी गवे शेतातून मुक्काम सोडत नसल्याने यंत्रणेची झोप उडाली आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गव्यांचा मानवी वस्तीतील वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
मंगळवारी, गव्यांच्या कळपाने शंभर फुटी रोडवर उसाच्या फडाच्या शेतीत तळ ठोकलेला दिसून आला. एका शेतात सकाळच्या सुमारास गव्यांचा कळप गेल्याचे स्थानिकांनी पाहिल्यानंतर वनविभागाचे गस्त पथक तैनात करण्यात आले. खबरदारीचा भाग म्हणून अग्निशामक दल व पोलिसांचे पथकास पाचारण करण्यात आले. गवे किती आणि कोठे थांबले आहेत, हे बघण्यासाठी ड्रोनने पाहणी करण्यात आली. यामध्ये गवे असल्याची खात्री झाली. मात्र, त्यांच्याकडून सायंकाळपर्यंत कोणतीही हालचाल झालेली नव्हती. वनपथकाने सायंकाळच्या सुमारास लाईट पाडून अंदाज घेण्याचा प्रयत्न केला; पण पुन्हा गवे फडात गायब झाले. आठच्या सुमारास मिरचीची धुरी करण्यात आल्यानंतर गव्यांच्या कळपाने फडात किंचित हालचाल केली, मात्र फडातून गवे बाहेर पडले नाहीत.
१५ दिवसांपूर्वी सहा गव्यांचा कळप पंचगंगा नदी काठच्या भागात आला होता. या कळपाने रमणमळ्यातील कडणे मळ्यात मुक्काम ठोकला होता. त्यानंतर तो कळप गायब झाला होता. त्यानंतर १५ दिवसांच्या आत गव्यांचा दुसरा कळप कोल्हापूर शहराच्या दिशेने आला आहे. त्यापूर्वी, हातकणंगले तालुक्यातील टोप संभापूर येथील गंधर्व या ठिकाणी गव्याचे दर्शन झाले. त्यामुळे गवा पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. टोप संभापूरमधील चिन्मय गणाधीश गंधर्वमध्ये गवा दिसून आला होता. सहा महिन्यांपूर्वी गव्याच्या हल्ल्यात एका तरुणाचा कोल्हापुरात मृत्यू झाला होता. ऑक्टोबर महिन्यात आजरा तालुक्यात एका महिला गव्याच्या तावडीतून थोडक्यात बचावली होती. तालुक्यातील भावेवाडीत ही घटना घडली होती. गवा शिरल्याने गावकरी हुसकावून लावत असतानाच गव्याने मुख्य रस्त्याच्या दिशेने पळ काढला होता. त्याचवेळी रस्त्याच्या कडेला असलेल्या महिलेचं ग्रामस्थांनी आरडाओरडा केल्यानंतर ती महिला जीवाच्या आकांताने पळत सुटल्याने थोडक्यात जीव वाचला होता.