no images were found
कोटीतीर्थ मार्केटमधील थकबाकीदारांचे चार दुकानगाळे सील : इस्टेट विभागाची कारवाई; दोन गाळेधारकांनी भरली थकबाकी
कोल्हापूर, : कोल्हापूर महानगरपालिकेच्या मालकीचे दुकानगाळे भाडेतत्त्वावर घेतल्यानंतर अनेक वर्षांपासून भाडे थकविणाऱ्या गाळेधारकांविरोधात महापालिकेच्या इस्टेट विभागामार्फत कारवाई करण्यात येत आहे. या अंतर्गत आज ई वॉर्डातील कोटीतीर्थ मार्केट येथे इस्टेट विभाग व उपद्रव शोध पथकाच्या संयुक्त पथकाने सहा दुकानगाळे सील करण्याची कारवाई केली. यापैकी दोन गाळेधारकांनी कारवाई दरम्यान तातडीने थकबाकी भरल्याने उर्वरित चार दुकानगाळे सील करण्यात आले. सील करण्यात आलेल्या दुकानगाळ्यांमध्ये स्वरुपाराम नयनराम चौधरी, मदन वामन मुडगडी, शेतकरी संघ लि. आणि सुभाषकुमार खुशालदास जैन यांच्या गाळ्यांचा समावेश आहे.
ही कारवाई आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. उपआयुक्त किरणकुमार धनवाडे, सहायक आयुक्त राम काटकर, इस्टेट ऑफिसर शेखरकुमार साळोखे, वरिष्ठ लिपिक अरुण भोसले, जनार्दन भालकर, एनडीएस पथकप्रमुख दीपक कांबळे, नसरुद्दीन नदाफ, इल्लाईप बंडवल, कल्पना शिरदवाडे, सदानंद फाळके आणि अभिजित उदाळे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
थकबाकी तातडीने भरण्याचे आवाहन
महानगरपालिकेच्या मालकीचे शहरातील अन्य ठिकाणचे थकबाकीदार दुकान गाळेधारक यांनीही आपली प्रलंबित भाडे थकबाकी तातडीने भरावी. थकबाकी न भरणाऱ्या गाळेधारकांविरोधात यापुढेही गाळे सील करण्याची कठोर कारवाई सुरू राहणार आहे. तरी गाळेधारकांनी थकबाकी भरून महापालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या इस्टेट विभागामार्फत करण्यात आले आहे.