no images were found
बालविवाह व सक्तीच्या विवाहांचे निर्मूलन करण्यासाठी जिल्ह्यात १९ ते २७ नोव्हेंबरदरम्यान विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन : बालविवाहमुक्त समाजनिर्मितीसाठी सर्व विभागांनी सक्रिय सहभाग घ्यावा – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड
कोल्हापूर, : बालविवाह व सक्तीच्या विवाहांचे निर्मूलन करण्याच्या उद्देशाने २७ नोव्हेंबर हा दिवस ‘बालविवाह व सक्तीचे विवाह निर्मूलन आंतरराष्ट्रीय दिन’ म्हणून पाळण्यात येणार आहे. या दिनानिमित्त तसेच बालहक्क सप्ताहाच्या अनुषंगाने जिल्ह्यात १९ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमांमध्ये शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा-महाविद्यालये, महिला बचत गट आणि नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले आहे.
बालविवाह ही बालकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणारी गंभीर सामाजिक समस्या आहे. त्यामुळे बालकांच्या शिक्षणावर, आरोग्यावर आणि व्यक्तिमत्त्व विकासावर विपरीत परिणाम होतो. तसेच सुरक्षित व सन्मानपूर्वक जीवन जगण्याच्या त्यांच्या अधिकारांवरही गदा येते. बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ ची प्रभावी अंमलबजावणी करून बालविवाहमुक्त समाज निर्माण करणे आवश्यक आहे.
या पार्श्वभूमीवर १९ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यात विविध जनजागृती कार्यक्रम, बालविवाह निर्मूलनाची प्रतिज्ञा, जनजागृती रॅली, किशोरी सभा, ग्रामसभा तसेच ग्राम बाल संरक्षण समित्यांच्या बैठका आयोजित करण्यात येणार आहेत. शाळा व महाविद्यालयांमध्येही विद्यार्थ्यांमध्ये बालविवाहाचे दुष्परिणाम, बालहक्क आणि कायदेशीर तरतुदी याबाबत जागृती करण्यात येणार आहे.
बालविवाह रोखणे हे समाजातील प्रत्येक घटकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे बालविवाहाची माहिती मिळाल्यास संबंधित यंत्रणांना तातडीने कळवावे आणि बालविवाहमुक्त समाजनिर्मितीसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुहास वाईंगडे यांनी केले आहे.