no images were found
स्वच्छ जल से सुरक्षा अभियान यशस्वीपणे राबवा – संजयसिंह चव्हाण
कोल्हापूर : जल जीवन मिशन अंतर्गत प्रतिदिन, प्रतिव्यक्ती 55 लीटरप्रमाणे पाणी पुरवठा करताना ते पाणी शुध्दीकरण केलेले असावे याबाबत खात्री करावी. जिल्ह्यामध्ये दुषित पाण्यामुळे साथरोग पसरणार नाही यासाठी शुध्द व गुणवत्तापूर्ण पाणी देण्यासाठी स्वच्छ जल से सुरक्षा अभियान यशस्वीपणे राबवा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले.
जल जीवन मिशन अंतर्गत दि. 1 ते 31 डिसेंबर या कालावधीत ‘स्वच्छ जल से सुरक्षा’ अभियानात राबविले जात आहे. या अभियानाअंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा आज जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू सभागृहात संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते स्वच्छ जल से सुरक्षा अभियान फलकाचे अनावरण करुन कार्यशाळेचा शुभारंभ करण्यात आला.
पाणीपुरवठा करताना सांडपाण्यामध्ये परावर्तीत होवू नये यासाठी गावागावांमध्ये वॉटर मीटर बसविण्याची कार्यवाही करावी. पंचगंगा प्रदूषणमुक्तीच्या धर्तीवर सर्वच गावांमध्ये सांडपाणी व्यवस्थापनासाठी कुटुंबस्तरावर तसेच सार्वजनिक स्तरावर उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चव्हाण यांनी यावेळी दिल्या.
या अभियाना दरम्यान अस्तित्वातील सर्व नळ पाणी पुरवठा योजना व रेट्रोफिटिंग करण्यात येणाऱ्या योजनांच्या प्रमुख स्त्रोतांचे हर घर जल ॲपव्दारे जीओ टॅगिंग पूर्ण करणे, प्रत्येक नळ पाणी पुरवठा योजनेच्या स्त्रोतांची मान्सून पश्चात कालावधीमधील रासायनिक व जैविक तपासणी पूर्ण करणे, पाणी गुणवत्तेसाठी गावस्तरावर नियुक्त केलेल्या महिलांव्दारे क्षेत्रीय पाणी तपासणी संचाव्दारे पाण्याची गुणवत्ता तपासणे, अभियानादरम्यान रासायनिक व जैविक तपासणीसाठी पाणी नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी पूर्ण करुन त्याच्या नोंदी केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर करणे, असे विविध उपक्रम राबविले जाणार असल्याचे जल जीवन मिशनच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे यांनी कार्यशाळेच्या प्रास्ताविकामध्ये सांगितले. प्रायमुव्हचे प्रतिनिधी सचिन सुपेकर यांनी स्वच्छ जल से सुरक्षा अभियानाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) अरुण जाधव, सर्व गटविकास अधिकारी, उपअभियंता व शाखा/ कनिष्ट अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग तसेच जिल्हा पाणी व स्वच्छता विभागातील सर्व तज्ज्ञ, सल्लागार उपस्थित होते. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक धोंगे यांनी आभार मानले.