no images were found
हस्तिनापूर के वीरच्या कलाकारांनी उलगडली पडद्यामागची रहस्ये
सोनी सबचा हस्तिनापूर के वीर हा शो महाभारतातील दिग्गज पांडव आणि कौरवांची भूमिका साकारणाऱ्या गुणी बालकलाकारांना एकत्र आणतो. पडद्यावर त्यांच्या व्यक्तिरेखा स्पर्धा, आव्हाने आणि गुरुकुलातील शिकवणींमध्ये गुंतलेल्या असतात, मात्र पडद्यामागचं वातावरण पूर्णपणे वेगळं असतं. तिथे हास्य, खेळीमेळीची मस्करी आणि भरपूर खोड्या यांचीच रेलचेल असते. यंदाच्या बालदिनानिमित्त, या मालिकेतील कलाकारांनी त्यांच्या व्यक्तिरेखांमागील खऱ्या स्वभावाची मजेशीर झलक दिली आहे आणि कॅमेरे बंद झाल्यानंतर सेटवर सगळ्यांचे मनोरंजन कोण करतं, याचा खुलासा केला आहे. काही बालकलाकार त्यांच्या खोडकर स्वभावासाठी ओळखले जातात, तर काहीजण त्यांच्या वयाच्या तुलनेत आश्चर्यकारकरीत्या शिस्तप्रिय आणि परिपक्व आहेत. त्यामुळे हस्तिनापूर के वीरचा सेट हा बालसुलभ निरागसता, मैत्री आणि धमाल यांचा एक उत्साही संगम बनला आहे.
द्रोणाचार्यांची भूमिका साकारणारे जितेन लालवानी म्हणाले, “भीमची भूमिका साकारणारा सुभाष हा निश्चितच सेटवरील सर्वात मोठ्या खोडकरांपैकी एक आहे. तो नेहमी काही ना काही खोड्या करण्यात व्यस्त असतो आणि सगळ्यांचं मनोरंजन करत असतो. अर्जुनची भूमिका साकारणारा उर्वा कदाचित सर्वात निरागस आहे, पण तोही खूप खोडकर असू शकतो! सहदेवची भूमिका करणारा मयंक हा असा असतो की, ब्रेक मिळाला की त्याला लगेच खेळायला सुरुवात करायची असते. नकुलची भूमिका साकारणारा हरित आणि दुःशासनची भूमिका करणारा शौर्य हे दोघेही त्यांच्या निरागस चेहऱ्यांमुळे सर्वात गोंडस वाटतात. दुर्योधनची भूमिका करणारा आयुध आपल्या अभिनयात खूपच उत्तम आहे, पण त्याच वेळी सेटवर मजा करण्याची एकही संधी तो सोडत नाही आणि त्याला खूप गप्पा मारायलाही आवडतं! सर्वात शिस्तप्रिय कोण, असं विचाराल तर मी युधिष्ठिरची भूमिका साकारणाऱ्या अथरचं नाव घेईन. तो आपल्या कामाबाबत खूप लक्षपूर्वक आणि प्रामाणिक आहे. प्रत्येक मुलं सेटवर वेगवेगळी ऊर्जा घेऊन येतं, हे पाहणं खूप छान वाटतं.”
गांधारीची भूमिका साकारणाऱ्या विवाना सिंह म्हणाल्या, “दुर्योधनची भूमिका साकारणारा आयुध हा नक्कीच सेटवरील सर्वात मजेशीर मुलगा आहे. तो सगळ्यांना हसवण्याची कला उत्तम प्रकारे जाणतो आणि गंभीर दृश्यांमधील ब्रेकमध्येही सेटवरील वातावरण उत्साही ठेवतो. युधिष्ठिरची भूमिका साकारणारा अथर हा त्याच्या वयानुसार खूपच समजूतदार आणि जबाबदार आहे. मला भीमची भूमिका साकारणारा सुभाषदेखील खूप आवडतो. तो सेटवरील सगळ्यांचा लाडका आहे आणि तो संपूर्ण टीममध्ये खूप सकारात्मकता आणि आपुलकी घेऊन येतो.”
राधेयची भूमिका साकारणारा वेंकटेश म्हणाला, “दुर्योधनची भूमिका साकारणारा आयुध हा नक्कीच सेटवरील सर्वात मोठा मस्तीखोर आहे आणि सर्वाधिक बोलणी खाणाराही तोच आहे! सर्वात जास्त वेळ तयार होण्यासाठी कोण घेतो, असं विचाराल तर ते बहुतेक मीच असेन. कारण मला दररोज दाढी करावी लागते आणि मेकअप रूममध्ये शिरताच मी सर्वप्रथम तेच करतो. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण व्हायला जवळपास एक तास लागतो! या वेळात मी माझी सकाळची कॉफी पीत असतो आणि काही फळं खात असतो, त्यामुळे तयार होणं हा माझ्यासाठी जवळपास एक तासाचा विधीच असतो. दुसरीकडे, भीमला मात्र कायम भूक लागलेली असते. तो खऱ्या अर्थाने खवय्या आहे आणि काहीतरी ऑर्डर करण्यासाठी नेहमी तयार असतो. ब्रेकच्या वेळी बहुतेकदा भीम आणि युधिष्ठिर माझी साथ देतात. आम्ही गप्पा मारतो, गाणी ऐकतो, एकमेकांना गोष्टी सांगतो, एकमेकांची फिरकी घेतो आणि खेळ खेळतो. सेटवरील एकही ब्रेक कंटाळवाणा होऊ नये याची आम्ही पूर्ण काळजी घेतो!”