
no images were found
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अंगीकारा – मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण
कोल्हापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अंगीकारा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी आज केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बिंदू चौक येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त उमेश घुले, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी सचिन साळे उपस्थित होते.
सर्वश्री आमदार सतेज पाटील, जयवंत आसगावकर, ऋतुराज पाटील, जयश्री जाधव व महानगरपालिका आयुक्त कादंबरी बलकवडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
सामाजिक समता पर्वअंतर्गत संविधान रॅलीमध्ये सहभागी शाळांना प्रतिनिधिक स्वरुपात सन्मानपत्र देण्यात आले. चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व धनादेश वितरीत करण्यात आले. या ठिकाणी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत रक्तदान शिबिर व चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले.
मान्यवरांनी रक्तदान शिबिर व चित्रकला प्रदर्शनास भेट दिली. सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या समता पर्वाचा समारोप यावेळी करण्यात आला. यावेळी बिंदू चौक येथे मोठ्या संख्येने विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.