no images were found
वाराणसी येथील परिसंवादात डॉ. प्रीती अदाणी यांनी आधुनिक आव्हानांवर मात करण्यासाठी प्राचीन ज्ञानाची उपयुक्तता अधोरेखित केली
वाराणसी, : प्राचीन ज्ञानाचा संबंध वर्तमानकाळातील समस्यांशी जोडला गेला पाहिजे आणि त्यातून लोकांचे जीवन अधिक चांगले करण्यासाठी मदत झाली पाहिजे, असे प्रतिपादन अदाणी फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. प्रीती अदाणी यांनी केले. वाराणसी येथे सोमवारी आयोजित ‘प्राचीन ज्ञानातून आधुनिक आव्हानांवर उपाय’ या विषयावरील जागतिक परिसंवादाच्या उद्घाटन सत्रात प्रमुख भाषण करताना त्या बोलत होत्या.
“केवळ प्राचीन आहे म्हणून एखादे ज्ञान मौल्यवान ठरत नाही. समकालीन समस्यांशी त्याची उपयुक्तता आपण शोधून काढतो, तेव्हाच त्याचे महत्त्व सिद्ध होते,” असे त्या म्हणाल्या. दुःख, असमानता आणि संघर्ष यांसारख्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी सभ्यताविषयक ज्ञानाचे जतन करून त्याचा प्रत्यक्ष उपयोग करण्याचे आवाहन त्यांनी केले. “ज्ञान आपल्याला जग बदलण्याची शक्ती देते, तर शहाणपण हे परिवर्तन अधिक चांगल्या दिशेने घडविण्याची खात्री देते,” असेही त्यांनी सांगितले.
डॉ. अदाणी यांनी ग्रीक तत्त्वज्ञ अॅरिस्टॉटल यांच्या मानवी उत्कर्षासंबंधीच्या विचारांचा, भगवान बुद्ध यांच्या दुःख निवारणाच्या शिकवणीचा तसेच प्राचीन चिनी तत्त्वज्ञ कन्फ्युशियस यांच्या नैतिक आचरण, नैतिक जबाबदारी आणि सामाजिक सलोखा यांवर आधारित विचारांचा उल्लेख केला. या परंपरांचा संबंध भारताच्या ‘वसुधैव कुटुंबकम्’ अर्थात संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे, या संकल्पनेशी जोडत त्यांनी सभ्यताविषयक ज्ञानाचा उपयोग लोकांचे जीवन सुधारण्यासाठी आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी करण्याचे आवाहन केले.
गेल्या तीन दशकांतील समुदाय विकासाच्या कार्याचा अनुभव सांगताना डॉ. अदाणी म्हणाल्या की, प्रगतीचे मोजमाप हे तिचा लोकांच्या जीवनावर होणाऱ्या परिणामांवरून केले पाहिजे. त्यांनी ‘सेवा’ अर्थात निःस्वार्थ भावनेने केलेल्या कार्याचा अर्थ समुदायांचे म्हणणे ऐकून घेणे आणि त्यांना स्वतःचे भविष्य घडविण्यास सक्षम करणे असा स्पष्ट केला. १९९६ मध्ये स्थापन झालेली अदाणी समूहाची सामाजिक विकास शाखा असलेली अदाणी फाउंडेशन आज २२ राज्यांमधील ७,००० गावांमध्ये कार्यरत असून, त्याचा १.३ कोटी लोकांच्या जीवनावर परिणाम झाला आहे.
यावेळी त्यांनी ‘भारत नॉलेज ग्राफ’ या उपक्रमाचाही उल्लेख केला. अदाणी समूहाने या उपक्रमासाठी १ कोटी डॉलरची आर्थिक बांधिलकी व्यक्त केली आहे. या माध्यमातून भारताचे सभ्यताविषयक ज्ञान विविध विषयांतील संशोधनासाठी उपलब्ध करून दिले जात असून, १४ डॉक्टरेट संशोधकांनाही त्याचा लाभ होत आहे.
‘बहुध्रुवीय जगाचे पुनरागमन’ या विषयावर बोलताना संयुक्त राष्ट्रांच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्कचे अध्यक्ष आणि कोलंबिया विद्यापीठातील सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे संचालक प्रा. जेफ्री डी. सॅक्स यांनी जागतिक आर्थिक शक्तीच्या बदलत्या संतुलनाचा आणि त्यामध्ये भारताच्या वाढत्या भूमिकेचा आढावा घेतला. जागतिक उत्पादनातील भारताचा वाटा २००० मध्ये ५.२ टक्के होता, तो २०२६ मध्ये ८.५ टक्क्यांपर्यंत पोहोचला असून, २०५० पर्यंत १३.१ टक्के आणि २१०० पर्यंत १५.१ टक्के होण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. तसेच आशिया आणि आफ्रिकेकडे जागतिक आर्थिक संतुलन झुकत असल्याचे सांगताना, अमेरिका, कॅनडा आणि युरोप यांचा एकत्रित वाटा २१०० पर्यंत १३.७ टक्क्यांवर येण्याचा अंदाजही त्यांनी मांडला.
भारतासह जागतिक स्तरावर शाश्वत विकासासाठी अदाणी समूह आणि अदाणी फाउंडेशनकडून करण्यात येत असलेल्या व्यापक कार्याचे प्रा. सॅक्स यांनी कौतुक केले. त्यानंतर झालेल्या संवादादरम्यान त्यांनी अदाणी समूहाला भारतातील परिवर्तन आणि प्रगतीला चालना देणाऱ्या प्रमुख घटकांपैकी एक संबोधले. देशातील पायाभूत सुविधांचा विस्तार आणि आर्थिक विकासामध्ये समूहाची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचेही त्यांनी नमूद केले.
व्यवसायात कौटुंबिक नावाशी जोडलेल्या जबाबदारीवरही त्यांनी विचार मांडले. भागधारकांच्या परताव्याला प्राधान्य देणाऱ्या कंपन्या आणि कौटुंबिक नावाने चालणारे उद्योग यांच्यातील फरक स्पष्ट करताना ते म्हणाले की, कौटुंबिक नावाने चालणाऱ्या व्यवसायांबरोबर त्या कुटुंबाचा वारसा आणि समाजासाठी योगदान देण्याची जबाबदारीही जोडलेली असते. भारताच्या आर्थिक परिवर्तनावरील चर्चेला व्यावसायिक जबाबदारी आणि सामाजिक योगदानाची व्यापक पार्श्वभूमी यामुळे मिळाली.
भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव श्री. विवेक अग्रवाल यांनी भारताच्या सभ्यतेचे चिरंतन सामर्थ्य आणि तिचे ज्ञान अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेल्या संधींवर प्रकाश टाकला. “कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने प्राचीन ग्रंथांचा अर्थ उलगडणे, त्यातील ज्ञानाची अधिक सखोल समज विकसित करणे आणि भारताचे सभ्यताविषयक ज्ञान भावी पिढ्यांसाठी अधिक सुलभ व उपयुक्त बनविणे शक्य आहे,” असे श्री. अग्रवाल म्हणाले.
यापूर्वी उद्घाटन सत्राची सुरुवात कोलंबिया विद्यापीठाच्या सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे वरिष्ठ संशोधन अभ्यासक डॉ. निरुपम बाजपेयी यांच्या भाषणाने झाली. त्यांनी या परिसंवादासाठी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या शुभेच्छा व्यक्त केल्या. तसेच विचार आणि आध्यात्मिक परंपरांच्या मिलाफाचे ऐतिहासिक केंद्र म्हणून वाराणसीच्या महत्त्वावर प्रकाश टाकला.
वाराणसी येथे आयोजित हा परिसंवाद एका आंतरराष्ट्रीय मालिकेचा भाग आहे. या मालिकेची सुरुवात ग्रीसमधून झाली असून, २०२२ मध्ये अथेन्स आणि २०२३ मध्ये स्टॅगिरा येथे बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यानंतर २०२४ मध्ये चीनमधील क्यूफू आणि बीजिंग येथे या मालिकेतील कार्यक्रम पार पडले.