no images were found
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लांबणीवर
नवी दिल्ली – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. त्यामुळे आता ही सुनावणी पुढच्या वर्षावर गेली आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घटनापीठापुढं सुरु आहे. या पाच न्यायमूर्तींपैकी एक न्यायमूर्ती उद्या उपलब्ध नसल्यानं सुनावणी लांबणीवर पडली आहे. त्यामुळं महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी कधी होणार हे स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळं आज पुन्हा एकदा ठाकरे गटाकडून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात मेन्शन करण्यात आलं होतं.
यावेळी ठाकरे गटाकडून वैधानिकदृष्या हे प्रकरण अत्यंत महत्त्वाचं असताना आणि सरकारच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले असताना यावर तात्काळ सुनावणी घेण्याची मागणी केली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात पुढील सुनावणी १० जानेवारीला होईल असं सांगितलं. यादिवशी मुख्य सुनावणीच्या वेळापत्रका संदर्भात निर्णय घेतला जाईल असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. त्यामुळं महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या मुख्य सुनावणीला कधी सुरुवात होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.
नेमकी शिवसेना कोणाची? या प्रश्नावरती गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील राजकारण ढवळून निघालं. निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हं गोठवलं. शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांना वेगळी नावे आणि चिन्हे दिली. त्यानंतर ठाकरे गटकडून शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्रत ठरवण्यासंबधी याचिका दाखल केली होती. याच १६ आमदारांना अपात्रतेच्या संदर्भात २९ नोंव्हेंबरला न्यायालयात सुनावणी होणार होती. परंतु ही सुनावणी लांबणीवर पडली होती. न्यायमूर्ती कृष्ण मुरारी हे उपलब्ध नसल्याने उद्या सुनावणी होऊ शकणार नसल्याचे सुप्रीम कोर्टाने नोटीसद्वारे स्पष्ट केले आहे.