no images were found
साखर कारखान्यांनी काटकसरीने पाण्याचा वापर व चारा व्यवस्थापनावर भर द्यावा : -जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड : आगामी साखर हंगाम सुरु करण्याबाबत साखर कारखानांच्या
कोल्हापूर, : पावसाचे प्रमाण यावर्षी कमी असल्याने उपलब्ध पाण्याचा योग्य पध्दतीने वापर करणे आवश्यक आहे. आगामी साखर गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी जनावरांच्या चारा व्यवस्थापन तसेच पाणी बचत आणि पर्यावरणपूरक शेतीला प्राधान्य द्यावे. पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासोबतच कारखान्यांमध्ये पाण्याच्या पुनर्वापराचे प्रभावी नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले.
साखर कारखान्यांच्या आगामी साखर गळीत हंगामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली साखर कारखानदारांची बैठक संपन्न झाली. या बैठकीस साखर सहसंचालक उज्वला पळस्कर, निवासी उपजिल्हाधिकरी गजानन गुरव, कृषी उपसंचालक नामदेव परीट, सहायक आयुक्त समाजकल्याण सचिन साळे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रमोद बाबर तसेच जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे कार्यकारी व व्यवस्थापकीय संचालक उपस्थित होते.
जिल्ह्यात पर्जन्याची तूट असल्याने संभाव्य चारा टंचाई टाळण्यासाठी साखर कारखान्यांनी कमी पाण्यात येणाऱ्या चारा पिकांच्या उत्पादनाला प्रोत्साहन द्यावे. शेतकऱ्यांना वेळेत बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक नियोजन करावे, कारखान्यांबरोबर होणारे कामगार करार तसेच वजन काटे तपासणी यावर संबंधित यंत्रणांनी लक्ष द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी दिले.
कमी पावसामुळे पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन कारखान्यांनी पाणी वापराचे सूक्ष्म नियोजन करावे. कारखान्यांमध्ये वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात. आगामी हंगामात पाण्याचा काटकसरीने वापर करून उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले.
ऊस तोडणीनंतर शेतातील पाचट जाळण्याऐवजी ते शेतातच ठेवण्याबाबत ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये व्यापक जनजागृती करावी. पाचटामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास आणि सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते. त्यामुळे कारखान्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाचट व्यवस्थापनाचे महत्त्व पटवून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
शेतीमध्ये कमी पाण्याची आवश्यकता असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. पाणी बचत, शाश्वत शेती आणि उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर यासाठी साखर कारखान्यांनी पुढाकार घ्यावा, असेही जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी स्पष्ट केले.आगामी साखर हंगाम सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन आणि साखर कारखान्यांनी समन्वयाने काम करणे आवश्यक असून, पाण्याचा काटकसरीने वापर ही काळाची गरज असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी यावेळी सांगितले