no images were found
गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीस्थळी २०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू : मोबाईल वापर, छायाचित्रण, वाहनांना प्रवेश आणि शस्त्रे बाळगण्यास मनाई
कोल्हापूर, : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) निवडणुकीची मतमोजणी सोमवार, १९ ऑक्टोबर रोजी शासकीय बहुउद्देशीय हॉल, रमणमळा, कसबा बावडा येथे होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतमोजणीच्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी केंद्रापासून २०० मीटर परिसरात मतमोजणी कर्मचारी, साहित्य पुरवठादार, उमेदवार आणि त्यांचे नियुक्त प्रतिनिधी वगळता अन्य व्यक्तींना प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. या परिसरात मोटारगाड्या व अन्य वाहनांचा वापर करणे किंवा वाहने थांबविण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे. निवडणुकीच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या शासकीय वाहनांना यातून वगळण्यात आले आहे.
मतमोजणीच्या ठिकाणी किंवा परिसरात सक्षम पोलीस अधिकाऱ्यांची लेखी पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय लाऊडस्पीकरचा वापर करता येणार नाही. तसेच आदर्श आचारसंहितेचा भंग होईल, अशी भाषणे, नक्कल, चित्रे किंवा चिन्हे रेखाटणे, त्यांचे प्रदर्शन करणे अथवा तत्सम कृती करण्यास मनाई करण्यात आली आहे.
मतमोजणी केंद्राच्या २०० मीटर परिसरात मोबाईल फोन, कॉर्डलेस फोन, वायरलेस सेट किंवा तत्सम इलेक्ट्रॉनिक उपकरणे बाळगणे अथवा वापरण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेले अधिकारी तसेच निवडणुकीच्या कामाशी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना नियमानुसार यातून वगळण्यात आले आहे. मतमोजणी केंद्रात उमेदवारांचे प्रतिनिधी किंवा अन्य प्रतिनिधींना मोबाईल वापरणे, छायाचित्रे काढणे, चित्रीकरण करणे अथवा मतदानाच्या गोपनीयतेचा भंग होईल, अशी कोणतीही कृती करण्यास मनाई आहे.मतमोजणी केंद्राच्या २०० मीटर परिसरात शस्त्रे, अग्निशस्त्रे व दारूगोळा वाहून नेणे, जवळ बाळगणे किंवा वापरण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. सुरक्षेसाठी नियुक्त पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना यातून वगळण्यात आले आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम २२३ अन्वये, तसेच मतदानाच्या गोपनीयतेचा भंग झाल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ मधील तरतुदींनुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.