Home Uncategorized गोविंदराव टेंबे यांचे संगीतसमीक्षा आणि साहित्य क्षेत्रालाही मोलाचे योगदान: केशवचैतन्य कुंटे

गोविंदराव टेंबे यांचे संगीतसमीक्षा आणि साहित्य क्षेत्रालाही मोलाचे योगदान: केशवचैतन्य कुंटे

6 second read
0
0
9

no images were found

गोविंदराव टेंबे यांचे संगीतसमीक्षा आणि साहित्य क्षेत्रालाही मोलाचे योगदान: केशवचैतन्य कुंटे

कोल्हापूर,: ज्येष्ठ संगीतकार गोविंदराव टेंबे यांनी संगीतक्षेत्राबरोबरच साहित्य आणि संगीतसमीक्षेतही मोलाचे योगदान दिले. त्यांच्या लेखनातून संगीतकलेचे सूक्ष्म आकलन, नाट्यप्रयोगांची जाण आणि तत्कालीन सांस्कृतिक जीवनाचे प्रत्ययकारी चित्रण दिसून येते. त्यामुळे टेंबे यांच्या साहित्याचा अभ्यासकांनी अधिक सखोल अभ्यास करण्याची गरज आहे, असे मत पुणे येथील संगीतशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक केशवचैतन्य कुंटे यांनी व्यक्त केले.

शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागात आज ज्येष्ठ संगीतकार व रंगकर्मी गोविंदराव टेंबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी श्री. कुंटे बोलत होते. यावेळी ज्येष्ठ शास्त्रीय गायक संगीताचार्य पं. सुधीर पोटे उपस्थित होते.

कुंटे म्हणाले, टेंबे यांच्या लेखनातील रसास्वादक समीक्षा हा विशेष उल्लेखनीय पैलू आहे. त्यांच्या समीक्षेचा पुढील पिढ्यांतील लेखक आणि संगीताभ्यासकांवर प्रभाव पडला. वामनराव देशपांडे, अरविंद मंगळूरकर आणि पु. ल. देशपांडे यांसारख्या व्यक्तींनी संगीतविषयक लेखनातून या परंपरेला पुढे नेले. टेंबे यांच्या लेखनात कलाकृतीचा आस्वाद घेताना तिचे तांत्रिक आणि भावनिक पैलू उलगडण्याची क्षमता दिसून येते. उस्ताद अल्लादिया खाँ यांच्यावरील टेंबे यांचे चरित्र संगीतसाहित्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. व्यक्तिचित्रणासोबतच त्या काळातील संगीतविश्व आणि त्याचे वातावरण वाचकांसमोर उभे करण्याचे कसब त्यांच्या लेखनात दिसते. त्यांच्या गद्यशैलीत सूक्ष्म विनोद, सहजता आणि आशयघनता यांचा सुंदर मेळ आहे. नाट्यक्षेत्रातील अनुभवामुळे त्यांच्या नाट्यविषयक लेखनात प्रयोगशीलतेची आणि रंगमंचीय सादरीकरणाची जाणही प्रत्ययास येते.

टेंबे यांच्या साहित्याचा आवाका लक्षात घेता, त्यांच्या विविध लेखनप्रकारांचा स्वतंत्रपणे अभ्यास होणे आवश्यक आहे. त्यांच्या साहित्यकृती, संगीतसमीक्षा आणि चरित्रलेखन यांवर संशोधन प्रकल्प तसेच विद्यापीठीय प्रबंध हाती घेतल्यास त्यांच्या योगदानाचे अधिक व्यापक आकलन होऊ शकेल, असेही कुंटे यांनी नमूद केले.

यावेळी पं. सुधीर पोटे यांनी गोविंदराव टेंबे यांच्या संगीत, नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील योगदानाचा आढावा घेतला. ते म्हणाले, मराठीतील पहिला बोलपट ‘अयोध्येचा राजा’ यामध्ये वयाच्या पन्नासाव्या वर्षी नायकाची भूमिका साकारण्याचा मान टेंबे यांना मिळाला. ‘मानापमान’ नाटकाला त्यांनी दिलेले संगीत क्रांतिकारी ठरले. नाटकातील प्रसंग, गाण्याची वेळ आणि गायकाच्या आवाजाचा विचार करून संगीत रचण्याची त्यांची पद्धत वैशिष्ट्यपूर्ण होती. हार्मोनियम वादनातील त्यांची स्वतंत्र शैली, रागदारीतील व्यासंग आणि संगीतासाठी पहाटेपर्यंत सराव करण्याची चिकाटी त्यांच्या कलेप्रती असलेल्या निष्ठेची साक्ष देते, असे पोटे यांनी सांगितले.

    पोटे म्हणाले, टेंबे यांची नाट्यकलेविषयीची भूमिका आजही मार्गदर्शक आहे. नाट्यकला हा केवळ धनोत्पादनाचा व्यवसाय नसून ती मानवी अंतःकरणाला स्पर्श करणारी, बुद्धीला चालना देणारी आणि जीवनाला सौंदर्य देणारी कला आहे, असा विचार त्यांनी मांडला होता. संगीत आणि कलाक्षेत्राबरोबरच क्रिकेट, वकिली आणि सर्कस व्यवस्थापन अशा क्षेत्रांतही त्यांनी काम केले. त्यांच्या ‘जीवनविहार’ आणि ‘माझा संगीत व्यासंग’ या आत्मचरित्रांतून त्यांच्या अनुभवांचा आणि कलासाधनेचा परिचय होतो. कोल्हापुरातील नव्या पिढीला गोविंदराव टेंबे यांच्या कार्याची पुरेशी माहिती व्हावी, तसेच त्यांच्या विविध क्षेत्रांतील कर्तृत्वातून चिकाटी आणि समर्पणाची प्रेरणा घ्यावी, असे आवाहन पोटे यांनी केले.

       यावेळी मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. विनोद ठाकूर देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.विशाखा जोशी यांनी सूत्रसंचालन केले, तर श्रुती खोचीकर यांनी आभार मानले. गुणीदास फौंडेशनचे राजप्रसाद धर्माधिकारी, डॉ. भाग्यश्री मुळ्ये, मिलिंद गुणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत साताऱ्यात शिक्षक व पदवीधर निवडणूक रणनीती वर चर्चा

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत साताऱ्यात शिक्षक व पदवीधर निवडणूक रणनीती वर…