Home Uncategorized महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा

महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा

3 second read
0
0
9

no images were found

महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा

लोककला, भक्ती-संगीत आणि नव्या पिढीचा भन्नाट मेळा

कोल्हापूर, – अभंग, भारूड, पोवाडा, गोंधळ… महाराष्ट्राची ओळख असलेल्या या कला आजही तितक्याच उत्साहाने जपल्या जात आहेत. याच पारंपरिक कलांना आजच्या नव्या पिढीशी जोडण्यासाठी झी एंटरटेनमेंटने ‘नादोत्सवम २०२६’ या सांस्कृतिक आणि भक्ती-संगीत महोत्सवाची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील सहा शहरांमध्ये होणाऱ्या या महोत्सवात संगीत, लोककला, कथाकथन आणि स्थानिक कलाकारांचा खास मेळ पाहायला मिळणार आहे.

पारंपरिक कलांना नव्या अंदाजात प्रेक्षकांसमोर आणण्याचा ‘नादोत्सवम’चा प्रयत्न आहे. अभंग, भजन, कीर्तन, भारूड, पोवाडा, गोंधळ यांसोबतच वेगवेगळ्या भागांतील लोकसंगीत आणि नृत्यप्रकारही या महोत्सवात पाहायला मिळतील. विशेष म्हणजे, प्रत्येक शहराची खासियत आणि तिथली लोककला यावरही भर दिला जाणार आहे.

महोत्सवातील खास आकर्षण असणार आहे ‘अभंग रिपोस्ट’. महाराष्ट्राच्या भक्तिपरंपरेतील लोकप्रिय अभंगांना आजच्या संगीताचा टच आणि नव्या पिढीला आवडेल अशा परफॉर्मन्ससह सादर केले जाणार आहे. त्यामुळे जुन्या अभंगांचा गोडवा आणि आजच्या संगीताची स्टाईल असे भन्नाट कॉम्बिनेशन प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

‘नादोत्सवम’च्या प्रत्येक शहरातील कार्यक्रमाला तिथल्या स्थानिक कलेचा खास रंग असणार आहे. ठाण्यात तारपा, पुण्यात जोगवा नृत्य, छत्रपती संभाजीनगरमध्ये स्थानिक लोककला, नाशिकमध्ये पारंपरिक लोकसंगीत, कोल्हापूरमध्ये पोवाडा, तर सोलापूरमध्ये भारूड अशा विविध कलाप्रकारांचा या महोत्सवात समावेश असणार आहे. याशिवाय प्रत्येक शहरातील इतर स्थानिक कलाकारही या मंचावर आपली कला सादर करणार आहेत.

झी मराठीवरील लोकप्रिय कलाकार प्रसाद जवादे आणि शिवानी सोनार या कार्यक्रमांचं सूत्रसंचालन करणार आहेत. ‘सारेगमप’मधील नव्या गायक-कलाकारांनाही या मंचावर आपली कला दाखवण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे पारंपरिक कलाकारांसोबतच नव्या पिढीतील टॅलेंटही या महोत्सवात पाहायला मिळणार आहे. झी मराठी, झी २४ तास, मराठी झी५ आणि झी टॉकीज या उपक्रमाशी जोडलेले आहेत.

‘नादोत्सवम २०२६’ची सुरुवात ३१ ऑक्टोबर रोजी ठाण्यातून होणार आहे. त्यानंतर २१ नोव्हेंबर रोजी पुणे, २८ नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर, ५ डिसेंबर रोजी नाशिक, १२ डिसेंबर रोजी कोल्हापूर आणि १९ डिसेंबर रोजी सोलापूर येथे हा महोत्सव रंगणार आहे.

या उपक्रमाबद्दल झी मराठी, झी टॅाकीज व मराठी झी ५ च्या बिझनेस हेड व चीफ चॅनेल ऑफिसर हेमा व्ही आर म्हणाल्या, “झी मराठी हे महाराष्ट्रातील प्रेक्षकांसाठी केवळ मनोरंजनाचं माध्यम नसून त्यांच्या कुटुंबाचा एक भाग आहे. महाराष्ट्रातील स्थानिक कलाकार आणि त्यांच्या टॅलेंटला व्यासपीठ देण्याची परंपरा झी मराठीने कायम जपली आहे. ‘नादोत्सवम’च्या माध्यमातून हीच नाळ आणखी घट्ट करत आम्ही महाराष्ट्रातील निवडक शहरांमध्ये पोहोचत आहोत. प्रत्येक शहराची स्वतःची ओळख आणि तिथल्या कलाकारांची वेगळी खासियत आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या शहरात, त्यांच्या लोकांसमोर परफॉर्म करण्याची संधी देणं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. ‘सारेगमप’च्या माध्यमातूनही आम्ही महाराष्ट्रातील घराघरातलं आणि स्थानिक टॅलेंट सातत्याने शोधत आलो आहोत आणि त्यांना मोठं व्यासपीठ दिलं आहे. ‘नादोत्सवम’च्या माध्यमातून हेच कलाकार आपल्या शहरात स्टारप्रमाणे परफॉर्म करताना पाहणं ही एक खास पर्वणी असेल.”

यूथ बिझनेस हेड अलंकार पाठारे म्हणाले, “‘नादोत्सवम’ची कल्पना आजच्या तरुण पिढीचा आपल्या मुळांशी असलेला कनेक्ट आणि त्यांची मॉडर्न म्युझिकची आवड या दोन्ही गोष्टी एकत्र आणण्याच्या विचारातून आली आहे. आजचा तरुण पारंपरिक अभंग आणि आपल्या संस्कृतीकडे नव्या नजरेने पाहतोय आणि त्याच्याशी स्वतःच्या पद्धतीने कनेक्ट होतोय. त्याचवेळी त्याला म्युझिक आणि परफॉर्मन्समध्ये मॉडर्न टच आणि फ्युजनही आवडतं. हीच गोष्ट लक्षात घेऊन ‘नादोत्सवम’ची संकल्पना करण्यात आली आहे. पारंपरिक कलेचा मूळ गोडवा आणि भावना कायम ठेवत ती आजच्या पिढीला एन्जॉय करता येईल अशा पद्धतीने सादर करणं, हा या उपक्रमामागचा मुख्य विचार आहे.”

महाराष्ट्रातील पारंपरिक कला आणि कलाकारांना मोठ्या मंचावर आणतानाच नव्या पिढीला आपल्या संस्कृतीशी पुन्हा कनेक्ट करण्याचा ‘नादोत्सवम’चा प्रयत्न आहे. सहा शहरांपासून सुरू होणारा हा प्रवास पुढे महाराष्ट्राच्या कला आणि भक्ती-संगीताचा दरवर्षीचा खास उत्सव बनण्याच्या दिशेने एक पाऊल ठरणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

ब्रिक्स पारंपरिक व देशी खेळ 2026 साठी निवड चाचणी

ब्रिक्स पारंपरिक व देशी खेळ 2026 साठी निवड चाचणी कोल्हापूर,: पारंपरिक व देशी खेळांना जागति…