no images were found
रंकाळा पद्माराजे उद्यान परिसरातील अतिक्रमणांवर महापालिकेची धडक कारवाई
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्र. 1 गांधी मैदान व अतिक्रमण निर्मूलन पथकाच्यावतीने आज रंकाळा येथील पद्माराजे उद्यान परिसरातील मुख्य रस्त्यांवर वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत हातगाड्या व इतर अतिक्रमणांवर आज धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये 1 लोखंडी स्टण्ड, १ स्टॅंड बोर्ड तसेच 15 हातगाड्या मालकांनी स्वत:हून काढून घेतल्या.
महापालिकेच्या पथकाने कारवाई सुरू केल्यानंतर काही हातगाडीधारक व विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांनी स्वतःहून आपले साहित्य हटविले. मात्र, महापालिकेच्या पथकाकडून वारंवार सूचना देऊनही अतिक्रमण न हटविणाऱ्या व्यावसायिकांवर प्रत्यक्ष कारवाई करून त्यांचे अनधिकृत साहित्य जप्त करण्यात आले. जप्त केलेले अनधिकृत साहित्य संबंधित व्यवसायधारकांना परत न देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून, आजच्या कारवाईत जप्त करण्यात आलेले साहित्य कायमस्वरूपी जप्त करण्यात आले आहे.
ही कारवाई महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या आदेशाने तसेच उप-आयुक्त किरणकुमार धनवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईमध्ये सहायक आयुक्त उज्वला शिंदे, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे तसेच अतिक्रमण निर्मूलन पथक व विभागीय कार्यालय क्र.1 मधील कर्मचारी सहभागी झाले होते.