no images were found
बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर तत्काळ गुन्हे दाखल करा : जिल्हाधिकार राहुल रेखावार
कोल्हापूर : बोगस डॉक्टरांना आळा बसावा, यासाठी खासगी वैद्यकीय व्यवसाय सुरू करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीचे प्रमाणपत्र तपासावे, अशी सूचना जिल्हाधिकार राहुल रेखावार यांनी केली आहे. यापुढे बोगस डॉक्टर शोधमोहीम आणखी तीव्र करून अधिकाधिक करण्याच्या सूचना त्यांनी समिती सदस्यांना केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय बोगस डॉक्टर चौकशी समितीची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.
ग्रामपंचायत स्तरावर नवीन खासगी दवाखाना, खासगी वैद्यकीय व्यवसाय सुरू करताना यापुढे संबंधित वैद्यकीय व्यावसायिक तथा खासगी डॉक्टर यांचे पदवी प्रमाणपत्र व नोंदणी प्रमाणपत्र यांची संबंधित ग्रामसेवक, स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन यांनी तसेच स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मदतीने पडताळणी करावी. प्रमाणपत्रे योग्य असल्याची खात्री केल्यानंतरच नवीन दवाखाना अथवा व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी.
जिल्ह्यातून प्राप्त एकूण १७ बोगस डॉक्टरविषयक तक्रारींचा आढावा घेण्यात आला. यावेळी दोषी बोगस डॉक्टरांवर केलेल्या कारवाईबाबत रेखावार यांनी समाधान व्यक्त केले. यापुढे बोगस डॉक्टर शोधमोहीम आणखी तीव्र करून अधिकाधिक बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर तत्काळ आणि गंभीर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना त्यांनी समिती सदस्यांना केल्या. या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्यचिकित्सक प्रतिनिधी अॅड. गौरी पाटील, तालुका आरोग्य अधिकारी व जिल्हा परिषद मुख्यालय दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.